पान:भोवरा (Bhovara).pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४४ / भोवरा

परकर दिसत होता- पदर कधीच पडला. शेवटी तिने हिसडा दिला, "ही गाडी चुकली तर सत्संग चुकेल, हरिकीर्तन चुकेल. तुला गाढवाला त्याची काय पर्वा?" असे तोंडाने चाललेच होते. ती आत आली. साडी सबंध सोडून एका हाताला घेतली , पोराला सावरले व शिव्या देत देत दोन्हीकडच्या बाकांतून पुढे गेली. कंडक्टरने घंटी दिली- दाराला हाताचा अडसर केला व आत घुसणाऱ्या लोकांना मोठ्या मिनतवारीने निवारले. गाडी चालू झाली.
 दारापाशी खूप दाटी झाली होती. "बाबूजी, माईजी, आगे बढो !" त्याने परत घोषणा केली व तिकिटे द्यावयाचे काम सुरू केले. "कुठ जायचे?" "कुठून बसलात आपण? अडीच आणे.".... "नाही नाही, कदापि नाही. दोनच आण्यांचं तिकिट आहे. तू लुच्चा आहेस."
 शेजारची दोन तीन माणसे म्हणाली, "असेच असतात हे कंडक्टर. दर बघत नाहीत, काही नाही. तोंडाला येईल ते सांगतात. इथून तिथून लुबडण्याचा धंदा!"
 "नाही, अडीच आण्याचाच दर आहे बाबूजी. हे बघा... " पलीकडचे दोघेतिघे ओरडले– "पुढच्या स्टॉपवर आम्हांला उतरायचंय. अजून तिकिटं दिली नाहीत; अशी हुज्जत घालीत बसणार आहेस, का आमची तिकिटं फाडणार आहेस?"
 कंडक्टरने पहिल्या माणसाचे तिकिट फाडले व ह्या दोघातिघांचे पैसे घेऊन त्याने यांचीही तिकिटं फाडली, तो मुक्काम आला. बस थांबली. लोकं उतरू लागले. कंडक्टर घाईघाईने दरवाजाशी गेला. काहीजण उतरता उतरता पैसे देऊन तिकिटे घेऊन जात होते. दोघे विद्यार्थी उतरू लागले. "बाबूजी, तुमची तिकिटं?" "का नाही आत असताना फाडलीस? आता देतो आहे होय पैसे? विसरा बच्चंजी." दोघेही कशी फजिती केली म्हणून फिदीफिदी हसत उडी मारून पसार झाले.
 क्षणभर कंडक्टरने मान वर केली; उजवा हात लांबवला. मला वाटल तो त्या विद्यार्थांच्या पाठोपाठ उडी मारून त्यांना मागे ओढणार. पण छे! सहनशीलतेची- तितिक्षेची-परिसीमा गाठण्यास शिकणे यासाठी कंडक्टरचा जन्म घेतलेल्या त्या भावी बुद्धाने तसे काही केले नाही. नवी माणसे आत यत होती. तो जरा बाजूला झाला व म्हणाला, "भाईजी, जरा आगे बढो...!"

*