पान:भोवरा (Bhovara).pdf/१२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२२ / भोवरा

समाज इतका हीन व दीन आणि सुखवस्तू माणसे इतकी नादान व संस्कृतिहीन का झाली? ह्या कोड्याचे उत्तर काय?
 त्या वेळी मला झट्दशी दोनच कारणे दिसली. मुसलमानी व इंग्रजी आमदानीत जहागीरदारी व जमीनदारी वाढली. दिल्लीच्या राजाने सनद दिली की केवढा तरी मुलूख एका माणसाच्या ताब्यात जाई; व तिथले सर्व शेतकरी त्या एकाचे ताबेदार बनत. कलकत्त्यात कॉर्नवॉलिसने केलेल्या लिलावात बंगाली जमीनदारांनी कधीही न पाहिलेल्या ओरिसाच्या हजारो एकर जमिनी विकत घेतलेल्या आहेत. अरबांनी व मागाहून युरोपीय लोकांनी आशियात चाललेला दर्यावर्दी व्यापार आपल्या ताब्यात घेतला. आतील व्यापार परकीयांच्या ताब्यात गेला. मंदिरे वगैरे बांधकामे थांबली व अव्याहत वाढत्या लोकसंख्येला जमीन कसण्याखेरीज निर्वाहाचे काही साधनच उरले नाही. शेतकरी दिवसेदिवस जास्त निर्धन बनत चालला. अर्धपोटी माणसांमुळे तऱ्हेतऱ्हेची रोगराई. पण सुखवस्तू लोक नादान का झाले, याची कारणपरंपरा मात्र इतक्या सोप्या तऱ्हेने सापडण्यासारखी नव्हती.
 आम्ही दर्शन करून परत आलो, तो जुगलबाबू काही माणसांबरोबर बोलत होते. ही सर्व माणसे सोशलिस्ट पार्टीची होती व ह्या विभागातील कार्य कसे चालले आहे व कसे व्हावे ह्याबद्दल वादविवाद सुरू होता. भारत स्वतंत्र होऊन नवे युग उगवले होते; पण नव्या युगाच्या जागृतीचे चिन्ह मला ह्या प्रवासात अजून तरी दिसले नव्हते. महंतजी व त्यांचा परिवार गाढ झोपेत होता. पण सकाळच्या प्रहरी शेतकरी व कामकरी ह्यांनी पुढील सहा महिन्यांत काय योजना कराव्यात, बिहारमधील साखर कारखान्यात मजूर- संघटनांतून काय फेरबदल करावेत ह्याबद्दल निदान वादविवाद करणारी ही तरुण पोरे नव्या युगाच्या सुरुवातीची चिन्हेच होती. त्यांच्याशेजारी महंतजींचा धाकटा पाच वर्षांचा मुलगा सदरा चघळत उभा होता. अर्धवट इंग्रजी, अर्धवट बिहारी भाषेत चाललेले संभाषण त्याला कळत नव्हते; पण तो मोठ्या उत्सुकतेने व एकाग्रतेने बोलणाऱ्या प्रत्येक माणसाकडे टक लावून ऐकत उभा होता. तो ह्या नव्या युगाचा वारसदार होता, की त्याचा पहिला बळी होता कोण जाणे!

१९५४
*