गाई म्हशी कोणाच्या ?
लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कुणाचा?
आई बापाचा
शेतीतून निघणारे धान्य आणि पशुधन या दोहोंच्या एकात्म समृद्धतेचे प्रतीक म्हणजे दिवाळी.
इ.स.१ ते ४०० या काळात हा सण यक्षरात्री म्हणून रुढ होता. वात्स्यायनाने कामसूत्रात या सणासाठी हे नाव वापरले आहे. कनोजचा राजा हर्षवर्धनाने नागानंद नाटकात या सणाला 'दीपप्रतिपदुत्सव' असे नाव दिले आहे. हा काळ इ.स.६०० चा. नीलमत पुराणात या सणास दीपमाला असे संबोधले असून त्याचे विस्तृत वर्णन आहे. या पुराणाचा प्रचार काश्मीरमध्ये होता. नवी वस्त्रे परिधान करणे, घर स्वच्छ आणि सुशोभित करणे, देवळे घरे दिव्यांनी सजवणे, द्यूत खेळणे आणि भाईबंदांनी एकत्र येऊन मिष्टान्न सेवन करणे ही या सणाची वैशिष्ट्ये वर्णिली आहेत. अल्बेरुनीने प्रवासवर्णनात या सणाचा उल्लेख केला आहे. कन्नड शिलालेखात या सणाचा उल्लेख आहे. महमद गझनी व अफगाण राजेही हा लोकोत्सव साजरा करीत असा उल्लेख आहेत.
अबुद फाजल याच्या 'ऐने अकबरीत' या इतिहास ग्रंथात लिहिले आहे की दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण, वैश्य समाज हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करी. घरोघरी दिवे लावीत. दिवाळीचे महत्त्वाचे सहा दिवस असतात. वसुबारस, धनतेरस, नरकचतुदर्शी, अमावास्या-दीपपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज. वसुबारसेला गाईंची पूजा करतात. गायवासरांना स्वच्छ करतात. गोठा स्वच्छा करतात. गुरांना पंचारतीने ओवाळतात. पुरणावरणाचा नैवेद्य करतात. गोठ्यातील मोकळ्या जागेत शेणाचा सडा घालून त्यावर शेणाचे गोकुळ उभे करतात. त्यात गौळणी तयार करून त्यांना सजवून मांडतात. या गोकुळाला वेस असते. शेतात जाणारी, पाणी भरणारी, स्वयंपाक करणारी, बाजार मांडून बसणारी अशा गौळणी त्यात असतात. त्यांत पेंद्या असतो आणि शेणाचा बळिराजा असतो. खेड्यातील शेतकऱ्यांच्या घरात शेणाचे गोकुळ मांडून त्यात पेंद्या व बळिराजा