Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ भाग

भारतीय साम्राज्य.

एतावता, इतकी गोष्ट सिद्ध आहे कीं, ज्या वस्तूचा जो मालक, त्याच्या मर्जीप्रमाणेच त्या लोकमतांच्या अनादरामुळे पदच्युत होण्याची भीति. वस्तूची व्यवस्था केली पाहिजे. ज्याची जी ठेव, त्याच्या इच्छेनुरूपच त्या ठेवीचा विनियोग झाला पाहिजे. आणि ज्यांचा जो अधिकार, त्यांच्या मनाप्रमाणेंच तो अमलांत आणिला पाहिजे. परंतु अशा अधिकाराचा दुरुपयोग करून राजा प्रजेकडे दुर्लक्ष करील, किंवा प्रजेच्छेचें अमर्यादपणें उल्लंघन करून त्यांचा छल करील, तर त्यांचे प्रायश्चित्त त्यास खचित भोगावें लागेल. इतकेच नाहीं तर तो पदच्युत झाल्या- वांचून कधीही राहणार नाहीं. व ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या ज्या प्रसंगी राजानें लोकांवर जुलुम करून प्रजापीडन केलें, किंवा अति निद्य कर्म आचरिलें, त्या त्या वेळीं प्रजेनं राजाचें शासन केल्यावांचून कधींही ठेविलें नाहीं. ह्या गोष्टीवरून इतकें खचित लक्षांत येण्यासारिखें आहे कीं, तत्वदृष्ट्या राजा ह्मणजे प्रजाजनांपैकीच एक मनुष्य असून, इतर प्रजावर्गाप्रमाणेंच त्याच्यांतही बुद्धिवैभवादि-गुणांचे न्यूनाधिकत्व दिसून येते; आणि त्या कारणानेंच राजा ह्मणजे ईश्वरी अवतार, असें मानण्यास सर्वथैव अडचण वाटते. तथापि, शासनपद्धतीसाठीं, कोणी तरी नियंता अथवा शास्ता असणें अगदीं अवश्य आहे, यांत संशय नाहीं.