Jump to content

पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म
 

सैन्यातील एक माणूस सैन्य सोडून पळून गेला की दुसरा त्याच्यामागून जाऊ लागतो. राजा, परस्परांचे बल ओळखणारे, उत्साही, प्राणाची पर्वा न करणारे आणि दृढनिश्चयी असे केवळ पन्नास शूर पुरुष असले तरी ते शत्रूच्या सैन्यास ठार करून सोडतात. इतकेच नव्हे तर परस्परांशी मिळून वागणारे, दृढनिश्चयी, कुलीन व सन्माननीय असे. सात, सहा किंवा पाचच योद्धे असले तरी ते शत्रूला भारी होतात.
 राजा, इतर उपायांनी कार्य होणे शक्य नसेल तर युद्ध करावे. कारण साम, भेद आणि दाम यांच्यानंतरचा उपाय युद्ध हा आहे. म्हणून परपक्षाच्या योद्धयांवर क्रौर्यमिश्रित सामोपचाराचा पुनः पुनः प्रयोग करावा. अशी चोहोबाजूने पीडा लागली म्हणजे शत्रू संधीला तयार होतो. शत्रूचे जे अगदी खाजगी लोक असतील त्यांच्यामध्ये फाटाफूट करण्यासाठी गुप्त हेरांचा प्रवेश करवावा. जो राजा शत्रूहून अत्यंत श्रेष्ठ असेल त्याच्याशी संधी करणे प्रशस्त होय. कारण तसे केल्याशिवाय, शत्रूला व त्याच्या इतर योद्ध्यांना प्रतिबंध होईल अशा रीतीने पीडा देणे शक्य नाही.
 आता शत्रूला अपराधाबद्दल क्षमाच का करू नये असे तू म्हणशील. पण क्षमा ही सज्जनांवर करावयाची असते. ती असज्जानाकडे केव्हाही जात नसते. हे कुंतीपुत्रा, क्षमेचे रहस्य तुला सांगतो. जो राजा शत्रूवर विजय मिळविल्यानंतर त्याला क्षमा करतो त्याची कीर्ती वाढते व तो मोठा अपराधी असला तरी त्याचे शत्रूही त्याजवर विश्वास ठेवतात. म्हणून शत्रूला जर्जर करून टाकल्यानंतर त्याला क्षमा केलेली चांगली. कारण तापविल्यावाचून वाकविलेले काष्ठ पुनरपि पूर्वस्थितीस येते.