Jump to content

पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना


 'महाभारतातील तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म' असे या प्रबंधाला नाव दिले आहे ते पूर्ण सार्थ आहे. राष्ट्राच्या अभ्युदयाला अत्यंत अवश्य अशीच ही तत्वे, हे सिद्धांत व ही मते आहेत. ऐहिक प्रपंचाचा विचार, ती तत्वे सांगणाऱ्या पंडितांनी, जेवढा केला होता त्याच्या शतांश जरी पुढल्या काळात, विशेषतः इ. स. १००० वर्षांनंतरच्या काळात येथल्या पंडितांनी केला असता तरी भारताची दुर्दशा झाली नसती, पण दुर्दैव असे की त्या काळात स्वतंत्रपणे तर कोणी समाजचिंतन केले नाहीच पण महाभारताचाही नीट अभ्यास केला नाही. पाश्चात्य विद्या येथे येईपर्यंत देशी भाषांत महाभारतातील तत्त्वज्ञान अवतरलेच नाही. या भाषांना रस होता तो त्यांतील रामकृष्णांच्या अद्भुत लीलांमध्ये ! त्यांतील समतेचे तत्त्वज्ञान, प्रयत्नवाद, धनाचे- कृषिगोरक्ष्यवाणिज्याचे महत्त्व, राजधर्माचे श्रेष्ठत्व, बुद्धिप्रामाण्य, व्यवहारवाद यांची त्यांनी संपूर्ण उपेक्षाच केली. या तत्त्वांची महती जाणण्याची ऐपतच त्या काळात भारतातून नाहीशी झाली होती. अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे समाजाच्या प्रगतिपरागतीकडे पाहून 'आपल्या मूलतत्त्वांची काही चिकित्सा करावयाची असते, त्यांचे गुरु-लाघव अनुभवाशी पडताळून पाहावयाचे असते हा विचारच भारतात या काळात कधी प्रभावी झाला नाही. त्यामुळे दारिद्र्य, अज्ञान, समाज-विन्मुखता व पारतंत्र्य हेच आपल्या नशिबी कायमचे लिहून ठेविले गेले. रजपूत, विजयनगर, मराठे, शीख यांनी या दृष्टीने काही प्रयत्न केले, पण स्थिर असे कोणतेच तत्त्वज्ञान त्यांनी अंगीकारलेले नव्हते. सामाजिक क्रान्तीचे तर त्यांनी प्रयत्नही केले नाहीत. त्यामुळे त्यांचे यश अल्पजीवी व मर्यादितच ठरले.
 ब्रिटिश विद्येच्या प्रसारानंतर आपण त्या अंध, मूढ अशा अवस्थेतून काहीसे मुक्त झालो हे खरे. पण गांधीयुगापासून पुन्हा आपल्या राष्ट्रीय प्रपंचात एकांतिक तत्त्वनिष्ठा, अवास्तव विचारसरणी, व्यवहार-शून्य दृष्टिकोण, ज्ञानोपासनेची उपेक्षा, शत्रुमित्रांतील विवेकहीनता,