यत्रैतत् लक्ष्यते सर्प वृत्तं स ब्राह्मणः स्मृतः ।
यत्रैतत् न भवेत् सर्प तं शूद्रमिति निर्दिशेत् ॥ २६
शूद्राच्या अंगी हे लक्षण जर दिसून आले व ब्राह्मणाच्या अंगी दिसून आले नाही तर तो शूद्रही शूद्र नव्हे व ब्राह्मणही ब्राह्मण नव्हे. तर हे सर्पा, ज्याच्या ठिकाणी वरील सत्य, अहिंसा या गुणांनी युक्त असे आचरण दिसेल तोच ब्राह्मण व ज्याच्या ठिकाणी ते दिसून येणार नाही तो शूद्र होय.
ब्राह्मणत्व किंवा शूद्रत्व हे गुणांवर व वृत्तावर अवलंबून ठेवण्याचे अगदी साधे कारण युधिष्ठिराने सांगितले आहे. तो म्हणाला, 'सध्या सर्व वर्णांचा संकर चालू आहे. कोणताही पुरुष कोणत्याही स्त्रीशी विवाह करतो. त्यामुळे जाती ही निवडून सांगणे फार कठीण आहे. म्हणूनच हे भुजंगश्रेष्टा, ज्याच्या ठायी संस्कारजन्य असे उच्च शील दिसून येईल त्याला ब्राह्मण म्हणावे, असे मी म्हणतो,' (वन. १८०)
वनपर्वातील ब्राह्मण व व्याध यांच्या संवादात ब्राह्मणानेही आपले असेच मत व्यक्त केले आहे. व्याध हा पूर्वजन्मी ब्राह्मण होता. पण या जन्मीसुद्धा त्याचे आचरण ब्राह्मणाप्रमाणेच सत्य, दान, दया, अद्रोह, यांनी अलंकृत असे होते. त्यावरून ब्राह्मण त्यास म्हणाला, 'या जन्मीदेखील मी आपणांला ब्राह्मण समजतो. कारण ब्राह्मण हा दांभिक होऊन जर दुष्कृत्ये करू लागला तर तो शुद्धतुल्य होय. व शूद्र सत्य, दम, वर्म यांनी युक्त असे आचरण करील तर तो ब्राह्मण होय, असे माझे मत आहे." -(वन. २१६)
जनकपराशर संवादात पराशराने शूद्रासंबंधी पुढील अभिप्राय दिला आहे. 'हे जे मी भूतदयादि तेरा धर्म सांगितले, त्यांचे जो शूद्र यथावत पालन करितो त्याला विद्वान लोक ब्रह्मदेवाशी सजातीय