Jump to content

पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील धर्मशास्त्र
२५
 

मांडीवर प्रहार करून ठार मारले त्या वेळी बलराम त्याचा निषेध करू लागला. तेव्हा कृष्णाने भीमाने तशी प्रतिज्ञाच केली होती, ती पुरी करणे भाग होते. असे सांगितले. प्रतिज्ञा मोडणे हा एके ठिकाणी धर्म होता व ती पाळणे हा दुसऱ्या ठिकाणी धर्म होता. आणि याचे विवेचन करताना श्रीकृष्णानेही प्रसंगपरत्वे सत्य हे असत्य ठरते व असत्य हे सत्य ठरते असा आपला अभिप्राय दिला.
 धर्म हा लोकांच्या उत्कर्षासाठी आहे आणि त्यामुळेच त्यांचे नियम अगदी निश्चित, केव्हाही, कोठेही मार्गदर्शन स्पष्ट करतील असे नाहीत, असे महाभारतकारांचे मत आहे असे आपल्या निदर्शनास आले. हे ध्यानात येताच एक नवी अडचण आपल्यापुढे येऊन उभी रहाते. भिन्न भिन्न प्रसंगी देश, काल, परिस्थिती यांप्रमाणे धर्माचे रूप बदलत असेल तर आपल्यावर आलेल्या विशिष्ट प्रसंगी आपण वर्तन कसे ठेवावे हे पुरुषाने कशाच्या आधाराने निश्चित करावयाचे ? सत्य, अहिंसा, क्षमा यांबद्दल काही शाश्वत सिद्धांत असते तर काही झाले तरी त्याप्रमाणे वागावे असे धोरण ठेवता आले असते; पण तसे नाही. कधी सत्य हे असत्य ठरते. आणि भलत्याच वेळी, जेथे समाजाची हानी होत आहे. अशा प्रसंगीही, सत्याचरण केले तर त्यामुळे प्राणी नरकास जातो असे भारतीय तत्त्ववेत्ते निक्षून सांगतात. (कर्ण.अ.६९) त्यामुळे कोणत्या वेळी काय धर्म्य व काय अधर्म्य हे ठरवावयाचे कसे हा मोठा प्रश्न आहे.

बुद्धिप्रामाण्य

 या धर्माधर्म- निर्णयात मनुष्याच्या बुद्धीला मुळीच वाव नाही, त्याने सर्वस्वी शास्त्रावरच, श्रुतीवरच अवलंबून राहिले पाहिजे असा