पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
१३७
 

नासम्यक्कृतकारी स्यात् अप्रमत्तः सदा भवेत् ।
कण्टको ह्यपि दुश्छिन्नो विकारं कुरुते चिरम् ।

- (शां. १४०, ६०).

 निष्काळजीपणाने काही करू नये, नेहमी सावध असावे. कारण एकादा काटा सुद्धा जर अयोग्य रीतीने तुटला तर तो पुष्कळ काळपर्यंत विकार उत्पन्न करतो.
 साहसी वृत्तीचा पुढील उपदेश प्रसिद्धच आहे.

न संशयमनारुह्य नरो भद्राणि पश्यति
सशयं पुनरारुह्य यदि जीवति पश्यति ।

-(शां. ४०, ३४).

 साहस करून जीव संकटात घातल्यावाचून ऐश्वर्य मिळत नाही. आणि साहसात उडी टाकूनही मृत्यू आला नाही- कारण तोच संभव फार- तरच हे ऐश्वर्य दिसावयाचे.
 ही वचने पाहिल्यावर भारतीय तत्त्वज्ञानाची चांगली कल्पना येते. राष्ट्राचा उत्कर्ष, वैभव, ऐश्वर्य, साम्राज्य या भव्य आकांक्षा त्या पुरुषांच्या चित्तांत होत्या. आपल्या लोकांनी यांसाठी अहोरात्र प्रयत्न करावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून जयिष्णू वृत्तीला पोषक अशीच अमृतवचने त्यांच्या मुखांतून नित्य येत असत. षड्रिपूंची निंदा करणे त्यांना मान्य नव्हते. संताप, क्रोध, द्रोह, ऐश्वर्याचा लोभ यांवाचून माणसाच्या हातून पराक्रम होणे शक्य नाही हे ते जाणून होते. साहसी वृत्ती, नित्य मरणमारणाच्या संग्रामाची सिद्धता यांवाचून ऐश्वर्य मिळणे अशक्य आहे हे त्यांना पक्के ठाऊक होते. बल, क्रौर्य, भेद यांवाचून शत्रू नमत नाही असा त्यांचा अनुभव होता. हा आपला सर्व अनुभव त्यांनी