राजाने सर्व प्रजांना आपापल्या धर्माप्रमाणे वागावयास लावून धर्माच्याच योगाने शांतिसंबंधीची सर्व कर्मे करावी. प्रजेचे पालन केल्यानेच राजाच्या इतिकर्तव्याची परिसमाप्ती होते. मग तो दुसरे काही करो वा न करो. -(शांति ६०).
किं तस्य तपसा राज्ञः किं च तस्याध्वरैरपि
सुपालितप्रजो यः स्यात् सर्व धर्मविदेव सः ।
- शां. ६९। ७३.
जो राजा प्रजेचे उत्तम पालन करतो तो सर्व धर्म जाणणाराच होय. अशा राजाला तपाची जरूर काय आणि यज्ञाची तरी व्याला गरज काय ?
वरील विवेचनावरून क्षत्रियांनाच फक्त संन्यास अनवश्य आहे पण ब्राह्मणांना मात्र त्यावाचून गती नाही, मोक्षप्रातीसाठी त्यांनी संन्यास घेणे अवश्य आहे, असे भारतीयांचे मत आहे, असा गैरसमज होण्याचा संभव आहे. पण तो खरा नाही. संन्यास अगदी अवश्यच आहे, त्यावाचून मोक्ष मिळणारच नाही असा दण्डक कोणाच्याच बाबतीत नाही. शुकाला ब्राह्मणधर्माचे स्वरूप कथन करताना व्यास म्हणतात-
आचार्येणभ्यनुज्ञातश्चतुर्णामेकमाश्रमम्
आविमोक्षात् शरीरस्य सोऽवतिष्ठेद् यथाविधि ॥
-शां. २३४.
(गुरुकडून ज्ञान संपादन झाल्यावर) गुरूची अनुज्ञा घेऊन चार आश्रमांपैकी कोणत्याही एकाचा स्वीकार करून त्याचे आमरण यथाशास्त्र आचरण करीत राहावे.
येथे ब्राह्मणाने संन्यासच घ्यावा असे सांगितलेले नाही. गृहस्थाश्रमही तितकाच योग्य आहे आणि ब्राह्मणाने आमरण गृहस्थाश्रमात
९...