Jump to content

पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
१२५
 

दैव व पुरुषप्रयत्न या दोघांचे आनुकूल्याने सिद्धी प्रात होते असे दिसते. हा विचार मनात ठेवूनच पुरुषाने कार्यास प्रवत्त व्हावे. आणि असा ज्याचा बुद्धिनिश्चय झालेला असतो तोच कोणत्याही कामाला बेधडक हात घालतो. कारण त्याने त्यातली गोम पूर्वीच ओळखिली असल्यामुळे काम फसले तरी तो दुःख मानीत नाही व झाले तरी हर्ष मानीत नाही. आणि हे भीमसेना हाच सिद्धान्त प्रस्तुत प्रकरणीही अनुमत आहे. म्हणजे आपण शत्रूंशी -कौरवांशी -युद्ध केल्यास जय प्रात होईलच असे म्हणता येत नाही. आणि नाहीच होणार असेही म्हणता येत नाही. सारांश, माझ्या बोलण्याचा मथितार्थ असा की पुरुषाने प्रयत्न करीत असावे. केवळ दैव फिरले असे म्हणून निस्तेज, विषण्ण किंवा म्लान होऊन बसू नये.' -(उद्योग अ. ७७).
 पितामह भीष्मांचे मत शेवटी देऊन हे 'पुरुषप्रयत्न' प्रकरण संपवू. ते म्हणाले, 'वत्सा युधिष्ठिरा, तू सदैव उत्साहाने प्रयत्न करीत जा. कारण, उत्साहावांचून राजांना त्यांचे दैवच फलदायक होत नाही. दैव व उद्योग हे दोन्ही सारख्याच प्रकारचे आहेत तरी उद्योग हा श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे. तेव्हा जरी तुझ्या उद्योगाला पुष्कळ संकटे आली, तरीही अंतःकरणाला ताप न होऊ देता सदोदित तू उद्योगच करीत रहा. कारण हे राजा, असे करणे हीच श्रेष्ठ राजनीती आहे.' -(शांति अ. ५६).

गृहस्थाश्रम

 धन, ऐश्वर्य यांची आकांक्षा व त्यासाठी प्रयत्न, क्षात्रवृत्तीचे अवलंबन व पुरुषप्रयत्नावर दृढ निष्ठा ही प्रवृत्तीधर्माची लक्षणे येथवर सांगितली. या सर्वांचा परिपोष होण्यास गृहस्थाश्रम हा