असेच आहे. पण त्याबरोबरच या मोक्षसाधनेसाठी संन्यास घेणे, संसार सोडणे, बायकामुलांचा पाश तोडून टाकणे, प्रपंचाच्या उलाढालीतून अलिप्त राहाणे हे अवश्य आहे, असे भारतीयांचे मत आहे, असेही प्रतिपादन केले जाते. हे प्रतिपादन मात्र सर्वथैव प्रमाणशून्य असून समाजाच्या ऐहिक व पारमार्थिक उत्कर्षालाही विघातक आहे. भारतीयांच्या विनाशाला व दुर्गतीला जी काही अनेक कारणे झाली त्यांत ही संसारविन्मुखता, वैयक्तिक व राष्ट्रीय प्रपंचाबद्दलची अनास्था हे एक प्रमुख कारण आहे हे निर्विवाद होय.
महाभारतात प्रवृत्तिधर्म हाच प्रामुख्याने सांगितलेला आहे हे मत लो. टिळकांनी गीतारहस्यात सिद्ध करून दाखविलेले आहे. त्याविषयी येथे चर्चा करण्याचा उद्देशच नाही. तात्त्विक दृष्ट्या केलेली ती सर्व चर्चा जिज्ञासूंनी गीतारहस्यातील 'विषयप्रवेश' व 'संन्यास आणि कर्मयोग' या प्रकरणात (पृ. ९, १०, ३११, ३२२) अवश्य पहावी. प्रवृत्तिधर्माची महती महाभारतात वर्णिलेली आहे की नाही हा प्रश्न माझ्या मते आता वादातीत आहे. तेव्हा येथे आता त्याची चर्चा करावयाची नाही. त्या प्रवृत्तिधर्माचे प्रतिपादन महाभारतात कसे केलेले आहे हे येथे सांगावयाचे आहे. महाभारत हा मुख्यतः ऐहिक उत्कर्षाची प्रेरणा देणारा, त्याचे मार्ग सांगणारा व त्या ऐहिक वैभवावाचून सर्व व्यर्थ होय असे निक्षून प्रतिपादन करणारा राष्ट्रीय ग्रंथ असल्यामुळे त्यांत प्रवृत्तिधर्माचे विवरण अगदी सविस्तर केलेले आहे. प्रवृत्तिधर्मच का श्रेष्ठ, मोक्षधर्म त्यावाचून कसा पंगू ठरतो, त्या प्रवृत्तिधर्माला धन, ऐश्वर्य यांचे किती महत्त्व आहे, तो गृहस्थाश्रमावाचून कसा अशक्य होईल, इत्यादी विवेचन विपुल तपशिलासह महाभारतात
पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/११०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारतातील प्रवृत्तिधर्म
१०३