पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ७५ ]


आणि भक्तांही तेचि दशा ? ॥ " छे! हे केवळ अशक्य. रुक्मिणीची तो पत्रिका--प्रेमानें फुललेली ती प्रेमपत्रिका पाहून त्यांचें हृदय कळवळलें होतें व ते येण्यास निघालेहि होते. पण विरहावांचून प्रेमलतिका तितकी भरारत नाहीं. रुक्मिणीला निराशेच्या हद्दीवर आणून मगच तिला उचलण्यांत जास्त मौज होती. हाय ! हाय ! देवा ! आपली ' सांवळी काया' पहाण्यासाठी उतावीळ झालेल्या, आपले 'मनोहर रूप' या नयनांत सांठविण्यासाठीं अधीऱ्या झालेल्या ह्या अभागिनीची आपणांस कांहींच कींव येत नाही काय ? अथवा तें दुर्लभ सगुणब्रह्म ह्या इतभागिनीला कुठचें दृष्टीस पडायला आाणि कुठले मिळायला ? या रुक्मिणीच्या शोकोमींनीं पाषाणसुद्धां ढळढळा रडायला लागतील मग आमचा प्रभु तर दयाघन होता ! असो. याप्रमाणें निराशेच्या कांठावर रुक्मिणी उभी होती, ' आसवांचें जल ' सारखे झरझर वहात होतें, तोंच शुभ- शकुनास प्रारंभ झाला. त्या वेळचें सुखद वर्णन वैदर्भी करते " तों प्रियकंठी आपण पडोन हेही सुखांत पाडावी । या भावेंचि स्फुरली कारे माझी भुजलता कृपा डावी ॥ " श्रीकृष्ण विदर्भनगरीशेजारील अंबिकापुरी येऊन राहिले होते. रुक्मिणीला अंबिके-च्या दर्शनास नेलें तेव्हां " मग बाई ! दादाचे मागधचैद्यादिकांहि मेल्यांचे । सैनिक मज रक्षाया आले. " रुक्मिणी त्या रक्षकांच्या परिवारांनी वेष्टित अंबिकेचें दर्शन घेऊन देवळाबाहेर येत आहे तोच " माझा मूर्त मनोरथ तो रथ आला प्रियास घेऊन. ” श्रीकृष्ण सर्व रक्षकसैन्य झोडपीत रुक्मिणीजवळ जाऊन ठेपले व माळा ऊचलिता प्रिय आपणहि रथावरूनिया लवला | लव लागेना ठों घे अंकी, करुणा समुद्र कालवला ॥ " श्रीकृष्णरुक्मिणीचें दिव्य मंगल मलिन वाचकांनी झटपट क्षणैकच अवलोकन करावें ! कारण त्या सुंदर देहास अंकावर घेऊन श्रीकृष्णास शिशुपालजरासंधादि दुष्टांचा अथांग सेनासागर फोडीत पार पडायचें आहे. हां हां म्हणतां श्री कृष्णप्रभु बिजलीसारखे त्यांतून बाहेर पडले त्या वेळेस इकडे शिशुपालादि ' कावळ्या ' ची जी ' कावकाव ' सुरू झाली त्याचे पंत वर्णन करतात-" हंसे मुक्ता नेली मग केला कलकलाट काकांनीं ॥ हाकांनी नभ भरिलें जाय सुरांच्याहि नाद हा कानीं ॥ " एकंदरींत सुभद्राहरणाप्रमाणेच रुक्मिणीस्वयंवराचा प्रसंगहि पंतांनीं मोठा बहारीनें वर्णिला आहे यांत शंका नाहीं. अस्तु . याप्रमाणे श्रीकृष्णानीं त्या कृष्णभ्रमरानीं - रुक्मिणीची प्राप्ति करून घेऊन तिला सुखी केलें !
 श्रीकृष्णाच्या एकंदर अष्टनायिका होत्या व त्यांतहि सत्यभामा व रुक्मिणी ह्या प्रभूस विशेष प्रिय असत. सत्यभामेच्या कथेचा वृत्तांतही असाच पण निराळ्या