पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ५ ]

जास्त वाढवून जात असे, करता करतां देवकी सातव्यांदां गर्भार झालं. पण सहा पुत्रांच्या मृत्यूनें भ्यायलेल्या त्या दीन गायीचा गर्भ या खेपेस पोटांतच गळाला. वसुदेवाची दुसरी भार्या रोहिणीही वसुदेवाबरोबर त्या भयाण तुरुंगवाड्यांतच होती. तिलाही याच सुमारास गर्भ राहिला, तेव्हां संशयाच्या तारेंत पापी कंस तिच्याहि पुत्रास ठार करायचा या भयानें गोवर्धनाजवळच्या आपल्या जहागिरीजवळ राह- णारा गौळवाड्याचा पाटील नंद त्याचा मित्र होता त्याच्याकडे तिला वसुदेवानें पोंचती केली. शेवटीं देवकी आठव्यांदां गर्भार राहिली. ती वार्ता कळल्यापासून कंसाचा जीव सारखा खालवर होत होता. तथापि तो जातीचा दुष्ट असल्यामुळे आपली ही स्थिति कोणास दिसून येऊं नये म्हणून खोट्या हास्याचें व उत्साहाचें आवरण आपल्या मुखावर बळेंच खेळविण्याची त्यानें पूर्ण खबरदारी घेतली होती; पण ‘ अंदर की बात राम जाने !' बाहेरून मात्र खोटेंच अवसान आणून एकीकडे छाती धडधडत होती तरी त्यानें तेव्हांपासूनच देवकीच्या कोठडीवर डोळ्यांत तेल घालून नंग्या समशेरीचा खडा पहारा ठेवला ! परंतु स्वातंत्र्याची सर्वगामी सत्ता अशा खड्या पहााऱ्याच्या तुरुंगांतच जन्मास येऊन त्यांतून बिनहरकत बाहेर पडते--तिच्यापुढे तुरुंगाचीं कड्याकडून व शिपायांच्या तरवारी लटक्या पडतात - याची, व देवकीच्या पोटी येणारें हें आठवें बालक म्हणजे मूर्तिमंत चैतन्य - स्वातंत्र्य होते याची बिचाऱ्या कंसास काय कल्पना ? ' बायरन् ' नामक विख्यात आंग्लकवीनें म्हटल्याप्रमाणें " दगडांच्या चार भिंतींच्या आवारांनीं खरा तुरुंग होत नसतो ".. स्वातंत्र्यप्रिय आत्मा अशा चौफेर संगिनीच्या कोटांतूनही बाहेर पडत असतो याची त्या खुळ्याला कोठून कल्पना असणार ? स्वातंत्र्याचा जन्म तुरं- गांतच होत असतो ! व मथुरेच्या तुरुंगांत देवकीच्या कोठडींत देवकीच्या पोटीं तेंच स्वातंत्र्य जन्मास आलें ! तो अष्टमीचा दिवस होता. रात्री बारा वाजण्याचा सुमार झाला होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता ! तुरुंगाजवळून वाहणारी यमुना नदी आनंदानें नाचत होती ! आकाशोद्यानांत गर्दी करणारे मेघ आपला आनंद जलवृष्टि करून प्रदर्शित करीत होते ! स्वातंत्र्यजन्माचे प्रसंगी याप्रमाणें बाहेर जलधारांचे तांडव आणि विद्युल्लतेचें नृत्य सुरू असतां श्रावण वद्य अष्टमीस देवकीचे आठवें बालक आठव्याच महिन्यांत जन्मास आलें-- त्या चिन्मय स्वातंत्र्य- मूर्तीस नऊ मास पुरे भरण्याइतका सुद्धां जणों दम निघाला नाहीं ! अथवा बाह्यतः जन्माचे कामीं व भावी आपत्ति टाळण्याचे काम सुद्धां वसुदेव-देवकी स