पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ९० ]

 ह्या प्रेमसागरांतून बाहेर पडायचे आमच्या जिवांवर येत आहे, पुनःपुन्हा त्यात डुंबत राहून कृष्णकन्हय्याच्या सुंदर रूपाचें, मधुर मुरलीचें व प्रेमळ प्रीतीचें दिव्य संगीत गात रहावें अर्सेच वाटतें ! त्या रूपसागरांत कितीहि बुड्या मारल्या, ते प्रेमसंगीत कितीहि घोळघोळून म्हटले तरी वेड्या जिवाची तृप्तिच होत नाहीं ! आणि जरी पुढील कार्यावर नजर देऊन मोठ्या कष्टाने आम्ही ह्या प्रेमळ प्रसंगांतून बाहेर पडत आहों तरी अंतरीच्या अंतरी, मनाच्या मनाला ' त्याच्या रूपाचा, मुरलीचा, व प्रेमाचा छंद लागावा, त्या संगीतांत ह्या चित्तानें सैदव डुलत रहावें, तुकोबांच्या साध्या वाणींत बोलावयाचें तर " तुझा विसर न व्हावा " हेच "दान" त्या दीनदयाळ " देवा " जवळ आम्ही अनन्य भावाने मागत आहों ! श्रीकृष्णाच्या चरित्राकडे निव्वळ ईश्वर ह्या दृष्टीने पहा, किंवा निव्वळ मनुष्य ह्या दृष्टीने पहा - प्रेमाचा गोड धडा तुम्हांला त्यांतून गिरवावयास मिळेल. पण श्रीकृष्णाच्या चरित्राचा समग्र उलगडा - इतर अवतारांप्रमाणेच - श्रीकृष्णभगवान् हे साकार प्रभु होते, मानवदेहधारी चिच्छक्ति होती; दुष्टदलनार्थ “ दोंवरी दो भुजा" घेऊन आलेली ती सगुण ईश्वरी मूर्ति होती असे मानले तरच होणार आहे. एरव्हीं नाहीं.
 शेवटीं ज्या “ विश्वंभरानें मज पामः कडून हें चरित्र “ बोलविलें," ज्या धन्या " ने आमच्या लेखनीरूपी " साळुंकी च्या तोंडून पंचमांतील मंजुळ वाणी " बोलवून तिच्याकडून आपलें सात्विक प्रेमानें डवरलेलें चरित्र गावविलें त्या विश्वंभर धन्याच्या — श्रीकृष्णाच्या - श्यामसुंदर कन्हय्याच्या चरणीं त्याच्याच कृपेनें गायिलेलें हैं चरित्र अर्पून तो तुम्हा सर्वांचें कल्याण करो असें चिंतून वाचकांची रजा घेर्तो.


। श्री कृष्णार्पणमस्तु ।


। शुभं भवतु ।

"