हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७९ )
गेलास तरी दुःखापासून तुझी मुक्तता होणार नाहीं! (३) जर तूं दुःखाला भितोस, दुःख जर तुला अप्रिय आहे, तर तूं बुद्धाला शरण जा, धर्माला शरण जा, आणि त्या संघाला शरण जा. शीलाचे नियम पाळ. ह्यानेंच तुझें हित होईल."
ह्या उपदेशानें तो ब्राह्मण बौद्धमतानुयायी झाला पुढें तो मोठा साधु झाला. तेव्हां त्याने हे उद्गार काढले.
ब्रह्मबंधु पुरे आसिं अज्जह्मि सचत्राह्मणो ।
तेविज्जो वेदसंपन्नो सोत्थियो चह्मि न्हातको ॥
पूर्वी मी केवळ नांवाचा ब्राह्मण होतों. परंतु आतां मी खरा ब्राह्मण झालों, कारण आतां मी त्रैविद्य (बौद्धधर्मांत सांगितलेल्या तीन विद्या जाणणारा) आहें, मी वेदसंपन्न (ज्ञानसंपन्न) आहे, मी पुरोहित (स्वस्तिसुखाचा लाभी) आहें, मी स्नातक (मुक्त) आहे !