परिचय पाहिजे. ज्या धर्माविषयीं लिहावयाचे त्याविषयीं मनःपूर्वक आदर व श्रद्धा पाहिजे; नाहींतर त्या धर्माचे रहस्य कदापि लक्ष्यांत येणार नाहीं. परंतु सध्यांच्या काळीं या श्रद्धेबरोबरच स्वतंत्रपणें विचार करून सार काय असार काय अंधश्रद्धेने रचलेला भाग कोणता व धर्माचा सनातन अंश कोणता, अतिशयोक्ति अज्ञान व धर्मभोळेपणा कोणता व शुद्ध सत्य कोणतें हे निवडून स्पष्टपणे सांगण्याचे सामर्थ्य अंगी असले पाहिजे. या सर्व गुणांची बिनमोल मेळवण प्रस्तुत पुस्तककर्त्याच्या अंगीं विशेषेकरून झालेली आहे. आमच्याच देशांत ब्राह्मणकुलीं जन्म, कुशाग्रबुद्धि, धार्मिक स्वभाव, संस्कृताचें उत्तम ज्ञान, नंतर बौद्धधर्म प्रचलित असलेल्या सिलोन, ब्रह्मदेश, वगैरे देशांत जाऊन, तेथील विहारांत बौद्ध भिक्षूच्या वृत्तीनें राहून नाणावलेल्या बौद्ध गुरूंच्या हाताखालीं मूळ पालिभाषेत बौद्ध धर्मग्रंथांचे यथासांग अध्ययन; व हें अध्ययन कीर्तीच्या आशेने किंवा केवळ जिज्ञासाबुद्धीने केलेले नसून बौद्धधर्मावर जीवापाड श्रद्धा ह्मणून अनेक दुःसह संकटे सोसून केलेलें; व इतके सर्व असून या विसाव्या शतकांतील कोणत्याहि पंडितास शोभेल अशी सारासार पाहून (critical) व ऐतिहासिक दृष्ट्या विचारकरण्याची पद्धति. या सर्व गुणांमुळे प्रो. धर्मानंद कोसंबी बौद्ध धर्मासंबंधीं जें जें लिहितील तें सर्व विचारी विद्वानांच्या आदरास पात्र होईल व त्यांपासून आह्मां हिंदुस्थानवासियांनाच नव्हे, परंतु पाश्चात्य देशांत बौद्ध धर्माच्या ज्ञानांत निष्णात ह्मणून गाजलेल्या पंडितांनाही पुष्कळ बोध होईल यांत मला संशय नाहीं.
बौद्ध धर्म हा विषय अत्यंत विस्तृत; या छोट्या पुस्तकांत त्याचा अत्यंत अल्प असा सारांशच येणार व तो कांहीं स्थलीं दुर्बोध राहाणारच. तरी पण ग्रंथकर्त्यानें सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा मोठ्या कुशलतेनें संग्रह केला आहे व त्या होईल तेवढ्या सुगम करून वाचकापुढे मांडल्या आहेत. व कांहीं कांहीं गोष्टींत तर बौद्ध धर्माच्या स्वरूपाची कल्पना या लहानशा पुस्तकाच्या द्वारें जशी येईल तशी पाश्चात्यांनी लिहिलेल्या मोठमोठ्या ग्रंथांच्या वाचनानेंहि येणार नाहीं.
पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/८
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २ )