बुद्ध राहत होते तेथे गेला. पहांटेच्या प्रहरीं बुद्ध भगवान् इकडून तिकडे चक्रमण करीत होते, त्यांनीं यशास पाहिलें. यश पुनः 'उपद्रुतं बत भो उपसृष्टं बत भो' (अहो सर्वत्र उपद्रव आहे, सर्वत्र उपसर्ग आहे) असें ओरडला. तें ऐकून बुद्धभगवान् ह्मणाले "यशा येथें उपद्रव नाहीं. येथें उपसर्ग नाहीं." तेव्हां यश बुद्धाजवळ जाऊन बसला. त्यानें भगवंतांच्या उपदेशश्रवणानें तेथल्या तेथें निर्वाणपद प्राप्त करून घेतलें, व भिक्षुसंघांत प्रवेश केला.
दुसऱ्या दिवशीं यशाचा बाप त्याचा शोध करीत ऋषिपत्तनांत आला. त्यानें बुद्धाला यशास पाहिलें आहे काय? असा प्रश्न केल्यावर बुद्ध त्याला ह्मणाले, "हे गृहपति, तूं घाबरूं नकोस. यशाला तूं या ठिकाणींच पाहशील." हें ऐकून त्याला धीर आला, व तो बुद्धाच्या बाजूस एका आसनावर बसला. तेव्हां बुद्धांनीं त्याला धर्मोपदेश केला. तो ऐकून त्याच्या मनामध्ये पूर्ण वैराग्य उत्पन्न झालें. आणि तो बुद्धाचा ताबडतोब उपासक झाला. तेव्हां बुद्धांनीं त्याची आणि यशाची तेथल्या तेथें गांठ घालून दिली. यशानें संसारत्याग केला याबद्दल त्याच्या बापास कांहींच वाईट वाटले नाहीं; कारण बुद्धोपदेशानें त्याच्या मनांत तसाच प्रकाश पडला होता. तो बुद्धाला ह्मणाला "भगवन्, यशाची आई यशास पाहण्यास फार उत्सुक झाली आहे. ती त्यासाठी फार शोक करीत आहे. तेव्हां कृपा करून आपण यशास बरोबर घेऊन उद्यां आमच्या घरीं भोजनास यावें." बुद्ध यशास बरोबर घेऊन दुसऱ्या दिवशीं त्या व्यापाऱ्याच्या घरीं गेले. तेथें त्यांनीं यशाच्या आईला व पूर्वाश्रमांतील बायकोला धर्मोपदेश केला. त्या उपदेशानें त्यांच्या मनांत प्रकाश पडला. त्या दोघी तत्काल बौद्ध उपासिका झाल्या. अर्थात यशाच्या गृहत्यागाबद्दल त्यांना कांहीं वाईट वाटलें नाहीं.