प्रथमध्यानापर्यंत मजल मारतां येते. तदनंतर दुसऱ्या कर्मस्थानाच्यायोगें इतर ध्यानेंहि संपादितां येतात.
द्वेषचरिताला मैत्रीभावना पथ्यकारक आहे.
मैत्रीभावनेचे विधान:-
अत्तूपमाय सब्बेसं सत्तानं सुखकामतं ।
पस्सित्वा कमतो मेत्तं सब्बसत्तेसु भावये ॥
आपल्याप्रमाणेंच सर्व प्राणिमात्र सुखाची इच्छा करितात, असें जाणून क्रमाकमानें त्या सर्वाविषयीं प्रेमभाव उत्पन्न करावा.
सुखी भवेय्यं निदुक्खो अहं निच्चं अहं विय ।
हिताच मे सुखी होन्तु मज्झत्ता चथ वेरिनो ॥
सदा सर्वदा मीं सुखी असावें, मीं निर्दुःखी असावें. माझ्याप्रमाणें माझे मित्रहि सुखी होवोत, मध्यस्थहि सुखी होवोत, आणि माझे वैरीहि सुखी होवोत!
इमम्हि गामक्खेत्तम्हि सत्ता होन्तु सुखी सदा ।
ततो परं च रज्जेसु चक्कवाळेसु जंतुनो ॥
ह्या आसपासच्या शेतांतील आणि ह्या गांवांतील सर्व प्राणी सर्वकाल सुखी होवोत. ह्या राज्यांतील प्राणी सुखी होवोत. ह्या विश्वांतील (सर्व) प्राणी सुखी होवोत.
तथा इत्थी पुमा चेव अरिया अनरियापि च ।
देवा नरा अपायट्ठा तथा दसदिसासु च ॥
त्याचप्रमाणें स्त्रिया आणि पुरुष, आर्य आणि अनार्य, देव आणि मनुष्य हे सर्व सुखी होवोत. दुर्गतीप्रत गेलेले प्राणीहि सुखी होवोत. दाही दिशांला सर्वप्राणी सुखी होवोत.