Jump to content

पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २७ )
अधिशीलशिक्षा किंवा शील

ह्मणजे काय याचा प्रथमतः विचार करूं. बौद्ध समाजांतील पुरुषांचे गृहस्थ, उपासक, श्रामणेर आणि भिक्षू असे चार भेद आहेत. त्याचप्रमाणे गृहिणी, उपासिका, श्रामणेरी आणि भिक्षुणी असे स्त्रियांचेही चार वर्ग केले आहेत. पैकीं भिक्षुणीचा आणि श्रामणेरीचा वर्ग आजला अस्तित्वांत नाहीं. बाकी सहा वर्ग ब्रह्मदेश, सिलोन वगैरे देशांतील बौद्ध लोकांत आढळतात. यांतील भिक्षूला आणि श्रामणेरांला लागू पडणारा जो अधिशीलशिक्षेचा भाग त्याचा आह्मांस येथे विचार करण्याची जरूरी वाटत नाहीं. एकतर तसें केल्यानें आजच्या विषयाचा फारच विस्तार होणार आहे; व दुसरें त्यापासून आपणाला तादृश फायदा होण्यासारखा नाहीं. तथापि ज्यांची तशीच जिज्ञासा असेल त्यांनी विनय ग्रंथाचें "Sacred Books of the East" मध्यें प्रसिद्ध झालेलें भाषांतर वाचावे.

 गृहस्थ आणि गृहिणी यांना लागू पडणाऱ्या शीलाचे इतर वर्गाला लागू पडणाऱ्या शीलाप्रमाणेंच- विहितशील (चारित्तसील) आणि निषिद्धशील (वारित्तसील) असे दोन भेद आहेत. बुद्धानें करण्यास सांगितलेल्या गोष्टी करणें हें विहितशील; व वर्ज्य करण्यास सांगितलेल्या गोष्टी वर्ज्य करणें हें निषिद्धशील होय.

 मंगलसुत्त, सिगालसुत्त इत्यादि सुत्तांतून गृहस्थांनीं आणि गृहिणींनी पाळण्यासाठीं बुद्ध भगवंतांनीं कांहीं गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांपैकीं, विधिशीलाची आपणांस नीट कल्पना व्हावी ह्मणून मंगलसुत्तांतील गाथा येथे देत आहे.
 कोणीएक देवता बुद्धास म्हणाली:-

बहू देवा मनुस्सा च मंगलानि अचिंतयुं ।
आकंखमाना सोत्थानं ब्रूहि मंगलमुत्तमं ॥ १ ॥