च्या कुलीन स्त्रीनें दिलेला दुधाचा पायस सेवन करून तो एका बोधिवृक्षाखाली (पिंपळाच्या झाडाखालीं) गेला. त्या रात्रीं त्यानें माराचा पूर्णपणें पराभव करून जगदुद्धाराचा धर्ममार्ग शोधून काढला. तेव्हां मार ह्मणाला:-
सत्त वस्सानि भगवंतं अनुबंधिं पदापदं ।
ओतारं नाधिगच्छिस्सं संबुद्धस्स सतिमतो ॥ १ ॥
सात वर्षेपर्यंत सतत भगवंताच्या मागें सारखा लागलों होतों; परंतु या विवेकी (स्मृतिमान्) बुद्धाचें कांहींच वर्म सांपडलें नाहीं.
तस्स सोकपरेतस्स वीणा कक्खस अभस्सथ ।
ततो सो दुम्मनो यक्खो तत्थवंतरधायथाति ॥ १ ॥
“याप्रमाणें मार शोकानें व्याकुळ झाला असतां त्याच्या काखेंतून विणा गळून पडला. तेव्हां तो मार अत्यंत दुःखी होत्साता तेथेंच अंतर्धान पावला!"
माराचा पराभव करून धर्ममार्ग शोधून काढल्यावर बोधिसत्व बुद्ध झाला. येथून पुढे त्याला संबुद्ध, तथागत, सुगत, धर्मराज, मारजित्, जिन इत्यादि संज्ञा लावतात. हा मार्ग त्यानें आपल्या वयाच्या ३६ व्या वर्षी शोधून काढला. यापुढील हकीकत महावग्ग ग्रंथांत दिली आहे. महावग्ग ग्रंथाचें इंग्रजी भाषांतर[१] उपलब्ध आहे, तें ज्यांना इंग्रजी येत असेल त्यांनीं अवश्य पहावें. महावग्गांतील विस्तृत वर्णन येथे देण्यास सवड नाहीं, तथापि त्यापैकीं कांहीं गोष्टींचा येथें उल्लेख केल्यावांचून राहवत नाहीं.
- ↑ Sacred Books of the East vol. XIII & XVII.