Jump to content

पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६ )

तडाक्यांत सांपडलों असून त्या सामान्य मनुष्याप्रमाणें जराग्रस्त मनुष्याला कंटाळलों किंवा त्याचा तिरस्कार केला, तर तें मला शोभणार नाहीं, ह्या विचाराने माझा तारुण्यमद समूळ नाहींसा झाला.
 "अविद्वान् सामान्य जन स्वतः व्याधींच्या जबड्यांत सांपडणार असून व्याधिग्रस्त मनुष्याकडे पाहून कंटाळतो व तो त्याचा तिरस्कार करितो, परंतु मी स्वतः व्याधीच्या तडाक्यांतून सुटलों नसतां त्या सामान्य जनाप्रमाणें व्याधिग्रस्ताला कंटाळलों किंवा त्याचा तिरस्कार केला तर तें मला शोभणार नाहीं. ह्या विचाराने माझा आरोग्यमद समूळ नष्ट झाला.
 अविद्वान् सामान्य जन स्वतः मरणधर्मी असून मृत शरीराकडे पाहून कंटाळतो व त्याचा तिरस्कार करितो! परंतु मी स्वतः मरणधर्मी असून त्या सामान्य जनाप्रमाणे मृताला कंटाळलों किंवा त्याच्या शरीराचा तिरस्कार केला तर तें मला शोभणार नाहीं. ह्या विचारानें माझा जीवितमद समूळ गळून गेला."

(अंगुत्तरतिकाय, निकनिपात.)

 ह्या उताऱ्यावरून आपणांस असें दिसून येईल की, बोधिसत्वाच्या राहण्यासाठीं जरी तीन प्रासाद होते तरी शुद्धोदन राजानें त्यास त्यांत कोंडलें नव्हते; किंवा तो गृहत्याग करील या भीतीनें त्यावर नृत्यांगनांचा खडा पहारा ठेवला नव्हता. सध्यांच्या एकाद्या संस्थानिकाच्या मुलाप्रमाणें सर्व प्रकारचीं करमणुकीचीं साधनें त्याला अनुकूल होतीं, तरी त्याचें समाधान झालें नाहीं. जराव्याधिमरणांच्या उग्र स्वरूपांची कल्पना उत्तरोत्तर त्याच्या मनांत दृढ होत गेली आणि त्याचा तारुण्य, आरोग्य व जीवित यांचा मद नाहींसा झाला.