ढांसळून पडली! तथापि ह्या पंडितांनीं वर सांगितलेल्या चरित्र- विषयक तीन ग्रंथांच्या पलिकडे जाऊन अति प्राचीन पालिग्रंथांत बुद्धचरित्रासंबंधीं काय माहिती मिळते, ललितविस्तरादि ग्रंथांतून सांगितलेल्या चमत्कारिक कथांस मूळ ग्रंथांत आधार आहे की काय, इत्यादि गोष्टींचा विचार केल्याचे दिसून येत नाहीं, व हें तर फार महत्वाचें आहे. तेव्हां केवळ मूळ पालिग्रंथ त्रिपिटक याच्या आधारें बुद्धचरित्राची माहिती देण्याचें येथें मी योजिले आहे.
कपिलवस्तु नांवाच्या शहरांत इ० स० पूर्वी ६०० वर्षांच्या सुमारास शाक्य नांवाच्या क्षत्रियांचे एक लहानसे महाजनसत्ताक[१] राज्य होतें, तेथल्या महाजनांना राजे अशी संज्ञा होती. ह्या राजांपैकीं शुद्धोदन नांवाच्या एका राजाला दोन बायका होत्या, पहिलीचें नांव मायादेवी व दुसरीचें नाव महाप्रजापति. ह्या दोघी अंजनशाक्याच्या मुली. मायादेवी प्रसूतीसाठी माहेरी जात असतां वाटेंतच लुंबिनि नांवाच्या वनांत प्रसूत होऊन तिला जो मुलगा झाला तो पुढे बुद्ध नांवानें प्रसिद्धीस आला. त्याचें नांव सिद्धार्थ असें ठेविलें होतें असें ह्मणतात. परंतु त्रिपिटकांत हें नांव माझ्या पाहण्यांत आलें नाहीं; ह्मणून बोधीसत्व- ह्मणजे भावी बुद्ध- या प्रसिद्ध नावानेच मी येथे त्याचा उल्लेख करितों. बोधिसत्वाच्या जन्मसमयीं घडले ह्मणून ह्मणतात अशा अद्भुत चमत्कारांस त्रिपिटक ग्रंथांत
- ↑ निरनिराळ्या क्षत्रिय घराण्यांतील प्रमुख पुरुषांना महाजन ह्मणजे राजा असें ह्मणत. हे राजे संथागार नांवाच्या नगर मंदिरांत जमून राज्यकारभार पहात असत. आपणांपैकी एकाला अध्यक्ष निवडीत. यास महाराजा असें ह्मणत. या प्रकारचीं आणखीही कांहीं राष्ट्रे उत्तर हिंदुस्थानांत होतीं. विशेष माहितीसाठीं प्रो० ऱ्हिस डेव्हिडसचें Buddhist India हे पुस्तक पहावें.