पान:बालहक्क (Balhakk).pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना

" Child Is Father of Man "
" मुले ही देवाघरची फुले "
" मुलांचा आनंद हीच ईश्वर सेवा
" मुली निष्पाप निरागस असतात "


 ही आणि अशी अनेक वाक्ये आपण सुभाषित म्हणून म्हणतो. पण जगतो का आपणतसे? वागतो का आपण तसे? तर त्याच उत्तर नाही असचं द्याव लागेल.

 सुदृढ सशक्त बालके ही देशाचे भवितव्य आहे आणि तसे जर असेल तर त्यांच्या हक्काची पायमल्ली ही देशाचे भवितव्य धोक्यात आणणारी ठरेल. म्हणूनच सुदृढ बालके जन्मू द्या.बालकांना खेळू द्या. बागडू द्या. खुप शिकू द्या. त्यांचे बालपण उमलू द्या. त्यांचे बालपण कष्टप्रद होणार नाही. कामाच्या ओझ्याखाली करपणार नाही. अकाली लादलेले लैंगिक जीवन आणि संसाराच्या ओझ्याखाली बालपण संपणार नाही. नको त्या स्पर्शानी त्यांचे बालमन भयप्रद होणार नाही. परिस्थितीमुळे व्यवस्थेमुळे गुन्हेगार ठरलेल्या बालकांना सुधारण्याची, माणूस बनण्याची संधी नाकारली जाणार नाही याची समाज म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.

 त्यासाठीच नगर बालहक्क संरक्षण समिती, बालहक्क संरक्षण समिती, सक्रीयपणे काम करेल यासाठी आपण जागरुक झाले पाहिजे. बालहक्क केवळ कागदावर न राहता बालकांना त्याचा जीवनात अनुभव घेता येईल त्यांचे व्यक्तीमत्व फुलायला समाज म्हणून आपण निकोप वातावरण निर्माण करु शकू यासाठीच ही पुस्तिका, कायद्याचे कार्यात्मक ज्ञान वाढविण्यासाठी प्रश्नोत्तर स्वरुपात लेक लाडकी अभियान आपणासाठी सादर करीत आहे.

वर्षा देशपांडे
लेक लाडकी अभियान