पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४


कवि ह्मणतात, वेळाला पंख आहेत; तो उडून जातो; तो कोणाच्यानें धरून ठेववत नाहीं. पण तें तसें नाहीं. त्याला पंख आहेत खरे; पण, त्या पंखांनींच त्याला धरितां येतें, आणि त्यांचा उपयोग करून घेतां येतो. व्यर्थ जातो त्या वेळाला मात्र पंख नसतात असें ह्मणतां येईल. कां कीं, धरायास कांहीं नसल्यामुळे तो हातचा सुटून जातो. असत्कर्मात वेळ जाण्यापेक्षां वेळ मुळींच नसणे बरें. शेक्सपियर ह्या नामांकित नाटकग्रंथकारानें एका पात्राकडून असें वदविलें आहे की, “प्रथमतः मी वेळ खराब केला; आणि आतां /वेळ मला खराब करीत आहे." ह्मणजे, आधीं मी वेळाचा नाश केला, आणि आतां वेळ माझा नाश करीत आहे. असें होतें खरें, ह्मणजे एके प्रकारें हें परस्परांचा सूड उगविण्यासारखें आहे.

 सेनेका ह्या तत्त्ववेत्त्याचें ह्मणणे असे आहे की, "आपले कांहीं तास लोक घेतात, कांहीं तास चोरीस जातात,आणि कांहीं तास कसे सुटकर निघून जातात ते आपणांस कळत देखील नाहींत." ह्मणजे, लोकरीतीस अनुसरून वागावें लागतें, त्यांत जे तास जातात, ते लोक घेतात ह्मणावयाचे; जे तास कांहीं भूल पडल्यामुळें तींत किंवा आळसांत निघून जातात, ते चोरीस जातात ह्मणावयाचे; आणि उद्योग करीत असतां, त्यामध्यें सिद्धि न आल्यामुळे, त्या कामांत पुनः पुनः वेळ घालवावा लागतो, ते तास सुटकर निघून जातात ह्मणावयाचे. अशा कोणत्याही पर्यायाने जरी वेळ गेला, तरी, तो असा नष्ट होतो कीं, त्याचा उपयोग पुढें कधीं कोणाला करितां यावयाचा नाहीं.