पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/86

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२

धारसंस्थानास मदत करण्याकरितां बडोद्याच्या राणी गहिनाबाईसाहेब ह्यांनी सखाराम चिमणाजी नामक एका शूर सरदाराबरोबर कांहीं सैन्य देऊन तिकडे पाठविलें. त्यांनी तिकडे जाऊन बराच बंदोबस्त केला; परंतु त्यांस तेथील प्रमत्त लोकांचे पारिपत्य करण्याकरिता आणखी एका शूर सरदाराची अवश्यकता भासूं लागली. ह्मणून त्यांनी बडोद्याहून बापूजी रघुनाथ ह्यांस बोलावून नेलें; व त्यांस सेनापतीचा अधिकार दिला. पुढें कांही दिवसांनी सखाराम चिमणाची मृत्यु पावले. तेव्हां धारची दिवाणगिरी बापूजी रघुनाथ ह्यांजकडे आली. त्यांनी मोठ्या शहाणपणानें व शौर्यानें शत्रूंचा पराभव करून धारच्या राज्यांत शांतता स्थापन केली. ह्यांच्या कारकीर्दींत इ. स. १८१७ सालीं माळव्यामध्ये राज्यक्रांति घडून आली, व सर जॉन मालकम हे माळव्याच्या बंदोबस्ताकरितां आले. त्यांजबरोबर ह्यांनी ता. १० जानेवारी १८१९ रोजीं मित्रत्वाचा तह करून धार संस्थानाचे रक्षण केले. ह्यांचे कारकीर्दींत धार संस्थानांत अनेक सुधारणा होऊन प्रजा सुखी झाली. ह्यांनी मैनाबाईचे चिरंजीव रामचंद्रराव पवार ह्यांचा, दौलतराव शिंदे ह्यांची नात अन्नपूर्णाबाई हिजबरोबर, मोठ्या थाटानें विवाहसमारंभ करून, ग्वाल्हेर व धार ह्या दोन्ही संस्थानांचा प्रेमसंबंध दृढतर केला. ह्यांचे शहाणपण व राजकारणकौशल्य पाहून दौलतराव शिंदे ह्यांची त्यांच्यावर फार प्रसन्न मर्जी झाली, व त्यांनी इ. स. १८२६ साली त्यांना ग्वाल्हेर येथे नेऊन दिवाणगिरीची वस्त्रें अर्पण केलीं. पुढें दौलतराव शिंदे लवकरच वारले. तथापि, बायजाबाईसाहेबांनी ह्या प्रख्यात मुत्सद्याची कर्तृत्वशक्ति व धूर्तता लक्ष्यांत घेऊन, त्यांस आपल्या कारकीर्दींत मुख्य प्रधानकीचीं वस्त्रें दिली. बापूजी रघुनाथ ह्यांच्यासारख्या कीर्तिशाली मुत्सद्याचे योग्य सद्गुण ध्यानीं घेऊन, बायजाबाईसाहेबांनी त्यांस आपल्या दरबारांतील प्रधानपद सादर केलें, हीच गोष्ट त्यांच्या शहाणपणाची दर्शक आहे. उत्तम