Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भाग ५ वा.
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द.

दौलतराव शिंदे मृत्यु पावले त्या वेळीं हिंदुस्थानांतील ब्रिटिश राज्यसत्ता लॉर्ड आह्मर्स्ट ह्या गव्हरनर जनरल साहेबांकडे होती. त्यांच्या राजनीतीचा उद्देश एतद्देशीय संस्थानें खालसा करण्याचा नसल्यामुळें त्यांनीं ग्वाल्हेर संस्थानाबद्दल फार उदार मतानें विचार केला. ग्वाल्हेरसारखें प्रचंड संस्थान बिनवारस समजून ब्रिटिश राज्यामध्यें सामील केलें असतें, तर प्रजाजन असंतुष्ट होऊन भयंकर अनर्थ ओढवला असता; व त्यामुळें चोहोंकडे अस्वस्थता उत्पन्न झाली असती. परंतु त्या वेळचें मुत्सद्दीधोरण "एतद्देशीय संस्थानें हीं ब्रिटिश राज्याच्या चिरस्थायित्वाचे आधारस्तंभ आहेत," असें शहाणपणाचें असल्यामुळें, एतद्देशीय संस्थानांच्या हक्कांची पायमल्ली न करितां, उलट तीं रक्षण करण्याकडे, त्या वेळच्या चतुर राज्यकर्त्यांची प्रवृत्ति असे. ह्या प्रवृत्तीचा परिणाम इ. स. १८५७ सालच्या बिकट प्रसंगी कसा हितावह झाला, व ब्रिटिश राज्य रक्षण करण्यास ग्वाल्हेरसारख्या एतद्देशीय संस्थानांनीं किती उत्कृष्ट साहाय्य केलें, हें इतिहासवाचकांस सांगावयास नकोच. ग्वाल्हेरच्या संस्थानिकास औरस संतति नसल्यामुळें त्यास दत्तक घेण्याबद्दल ब्रिटिश रेसिडेंटानें आग्रहपूर्वक विनवणी करावी; तथापि त्यानें ती न जुमानतां, आपल्या पत्नीच्या शहाणपणावर हवाला देऊन ब्रिटिश सरकारावर आपला पूर्ण विश्वास ठेवावा; व ब्रिटिश सरका-