पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/54

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१

घोडेस्वार व १२० तोफा इतकें जय्यद सैन्य होतें. डी बॉयन ह्याच्या मागून पेरन हा त्या सैन्याचा अधिपति झाला. त्याच्या ताब्यांत चंबळा नदीपासून पतियाळापर्यंत सर्व शिंद्यांचा प्रांत होता. परंतु त्याचें व लखबादादाचे वैर उत्पन्न होऊन शिंद्यांच्या सैन्यामध्यें फूट झाली. व हीच फूट शेवटी शिंद्यांची उत्तर हिंदुस्थानांतील सत्ता व स्वातंत्र्य हीं संपुष्टात आणायास कारणीभूत झाली.
 दौलतराव शिंदे ह्यांस बालपणापासून लष्करी शिक्षण नसल्यामुळें व त्यांनीं स्वतः कधीं सेनापतीचें काम केले नसल्यामुळें, त्यांना सैन्याची व्यवस्था कशी करावी ह्याचे विशेष ज्ञान नव्हतें. त्यामुळे त्यांना निरनिराळ्या अधिकाऱ्यांवर अवलंबून राहून, त्यांच्या तंत्रानें चालण्या वांचून गत्यंतर नव्हतें. परंतु त्यांस तारुण्याची उमेद व अभिमान विशेष असल्यामुळें, जुन्या लोकांचे अनुभवही केव्हां केव्हां त्यांना अप्रिय वाटत असत. त्यांची विशेष प्रवृत्ति डामडौल व बाह्य देखावा ह्यांकडे फार असे. हीच प्रवृत्ति त्यांच्या नाशास कारण झाली. ह्या संबंधाने अशी एक गोष्ट प्रसिद्ध आहे कीं, दौलतराव शिंदे ह्यांनी उत्तर हिंदुस्थानांत जातांच, प्रथम उज्जनी एथे आपली टोलेजंग छावणी बांधण्याचा निश्चय केला. त्या वेळीं गोपाळरावभाऊ नामक एका जुन्या सरदारानें भर दरबारामध्यें त्यांची कानउघाडणी केली. त्यांनी सांगितलें कीं, "ज्या आमच्या वाडवडिलांनीं मराठी राज्य स्थापन केलें, त्यांनीं घोड्याच्या पाठीवर आपली घरें केली होती. ह्मणजे ते रात्रंदिवस घोड्यावर स्वार होऊन कालक्रमणा करीत असत. परंतु हळूहळू पुढें घोड्याच्या पाठीवरील घरें जाऊन, त्याऐवजीं कापडाचीं घरे ह्मणजे तंबू डेरे वगैरे अस्तित्वांत आली; आणि आतां तुह्मी मातीची घरें बांधून लष्कराची छावणी उभारीत आहां. परंतु हे लक्ष्यांत ठेवा कीं, ही छावणी अल्पकाळांत मातीमोल किंमतीची होईल." दौलतराव शिंदे ह्यांनीं हे भाषण