Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४

बाई ह्यांचा जन्म इ. स. १७८४ साली झाला. बायजाबाईच्या बाळपणाची माहिती उपलब्ध नसल्यामुळें ती देतां येत नाहीं. तथापि ती लहानपणीं फार बाळसेदार व दखणी असून, तिजवर सुंदराबाईचें फार प्रेम होतें, एवढें सांगण्यास हरकत नाहीं. सखारामराव घाटगे ह्यांच्या स्थित्यंतराचें व त्या वेळच्या देशस्थितीचे चित्र लक्ष्यात घेतले, तर बायजाबाईचें बाळपण राजवाड्यांतील राजलक्ष्मीचे बहुविध विलास उपभोगण्यांत गेलें असावें, असे मानितां येत नाही. अनेक वेळां प्राप्त झालेलीं राजकीय संकटे, सदासर्वदां अनुभवलेले घोड्यावरील प्रवासाचे कष्ट, आणि प्रसंगविशेषीं प्राप्त होणारें शिलेदारी पेशाचें सुखपर्यवसायी दुःख, अशा प्रकारच्या परिस्थितीमुळें मराठे सरदारांच्या मुलांवर जे संस्कार होणें साहजिक आहेत, ते बायजाबाई व त्यांचे बंधु ह्यांच्यावर झाले होते, असे ह्मणण्यास कोणताच प्रत्यवाय नाहीं. हीं मुलें अशा प्रकारच्या परिस्थितींत वाढल्यामुळे सुदृढ, सशक्त, धाडशी, व घोड्यावर बसण्यांत पटाईत अशीं निपजलीं होतीं. बायजाबाई ही अगोदरच रूपसंपन्न असून, तिच्यामध्ये हे वरील गुण वास करीत असल्यामुळें तिची कीर्ति महाराष्ट्रांतील थोर थोर सरदारांमध्ये पसरली; व दौलतराव शिंद्यांसारखे तरुण व रंगेल सरदार तिच्या सौंदर्यावर लोलुप होऊन तिला वरण्यास उत्सुक झाले. बायजाबाई शिंदे ह्यांस कित्येक इतिहासकारांनीं 'दक्षिणची सौंदर्यलतिका' ( Beauty of the Deccan ) अशी संज्ञा दिली आहे. ती अगदी यथार्थ आहे. राजस्थानांतील कृष्णाकुमारी इत्यादि लोकप्रसिद्ध लावण्यवतींच्या लग्नाचे प्रसंग ज्याप्रमाणे मोठमोठीं राजकारस्थानें घडविण्यास कारणीभूत झाले, त्याप्रमाणें बायजाबाई ह्यांचे लग्न हे देखील महाराष्ट्रांतील एक राजकारस्थान घडवून आणण्यास कारणीभूत झालें.

______________