पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/30

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देखील ‘दे माय धरणी ठाय' करून सोडिलें. मारवाडावरील मराठ्यांच्या स्वारीवर, राजस्थानांतील भाटांनी जीं कवित्तें रचलीं आहेत, त्यांत, जयाप्पा शिंद्याच्या रणपटुत्वाचे विस्मरण रजपूत लोकांस कधींही होणार नाहीं, असें ध्वनित केले आहे. असो.

 जयाप्पा शिंदे ह्यांचा नागोरच्या वेढ्यामध्यें जोधपुरचा राजा बिजेसिंग ह्यानें अत्यंत कपटानें मारेक-यांकडून वध करविला. मृत्युसमयीं जयाप्पाचे बंधु दत्ताजी शिंदे हे जवळ होते. ते प्रियबंधूचा शस्त्रविदीर्ण व अचेतन देह अवलोकन करून शोक करूं लागले. त्या वेळी हा लोकोत्तर वीरपुरुष आपल्या बंधूस हिंमत देऊन बोलता झाला कीं, "वैरी युद्धास आला आणि तू रांडेसारखा रडतोस ! हें क्षात्रधर्मास उचित नाहीं. आतां मजला कांहीं होत नाहीं. तुह्मीं शत्रुपराभव करावा." अहाहा! इतकें अलौकिक क्षात्रतेज ज्याच्या अंगीं चमकत होते, तो योद्धा मृत्यूची काय पर्वा करणार आहे ? मोरोपंतांनी झटलेच आहेः

मरण रुचे वीराला, न रुचे परि कधी अपयशे मळणें ।

 १ टॉड साहेबांच्या राजस्थानच्या इतिहासांत पुढील पद्य दिले आहे:-

याद घणा दीन आवेशी, हाप्पा वाला हेल।
भागा तीनो भूपति, माल खजाना मेल ॥ १ ॥

 ह्याचा तात्पर्यार्थ असा कीं, “आप्पाच्या रणप्रसंगाची आठवण लोकांस पुष्कळ दिवस राहील. रणांत पाठ न दाखविणारे मारवाड, बिकानीर, व रूपनगर येथील तीन भूपति देखील रणांगणांमध्यें आपले सर्व सामानसुमान व जडजवाहीर टाकून पळून गेले ! "

 २ जयाप्पा शिंदे नागोरच्या वेढ्यामध्ये मारले गेले, त्या वेळीं श्री० रघुनाथराव पेशवे ह्यांनीं जयाप्पाचे चिरंजीव जनकोजी शिंदे ह्यांस जें समाधानपत्र पाठविलें, त्याचें उत्तर आह्मांस उपलब्ध झाले आहे. तें फार हृदयद्रावक असून त्यांतही जनकोजीचे क्षात्रतेज चमकत आहे. ह्मणून तें येथें सादर करितों:-