पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/24

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे
ह्यांचे चरित्र
❖❖❖
भाग १ ला.
---------------शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत.


शिंदे ह्यांचे घराणे महाराष्ट्राच्या इतिहासांत फार प्रसिद्ध आहे. हें घराणे फार पुरातन असून, ह्यांतील कित्येक पुरुष, भोंसले, शिर्के, घोरपडे, जाधव, घाटगे वगैरे जुन्या मराठे सरदारांप्रमाणे मुसलमानी अमदानींत स्वपराक्रमानें उदय पावले असावेत, असे मानण्यास जागा सांपडते. 'रविराव' हें, 'रुस्तुमराव’ ‘झुंझारराव' ह्यांसारखे बहुमानदर्शक पद शिंद्यांच्या एका घराण्याकडे होते, असा उल्लेख ग्रांटडफ साहेबांच्या इतिहासांत दृष्टीस पडतो. ब्राह्मणी राज्यामध्ये शिंदे नांवाचे पुरुष मोठमोठे लष्करी अधिकार उपभोगीत होते, अशीही माहिती मिळते. मुसलमानी अमदानींतील मराठे सरदारांचा इतिहास अगदीं अंधकारांत असल्यामुळे त्याविषयीं अधिक खुलासा करितां येत नाहीं. तथापि महाराष्ट्रराज्यसंस्थापक छत्रपति शिवाजी महाराज ह्यांच्या कारकीर्दीपासून शिंदे घराण्यांतील पुरुषांचा नामनिर्देश जुन्या बखरी व जुने कागदपत्र ह्यांत यथास्थित सांपडतो; व त्यावरून हें घराणे मराठेशाहीच्या अगदी प्रारंभापासून अस्तित्वांत आहे, असे निःसंशय ह्मणतां