पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६



नाहीं. तथापि तिनें कोणत्याही प्रकारें अविचाराचें वर्तन न करितां, आलेलें संकट निमूटपणें सहन केलें. त्या वेळीं तिनें युद्धाचा प्रसंग आणिला असता, तर तसें करणें तिला अशक्य नव्हतें. परंतु इंग्रजांचे सैन्यबल व साधनप्राचुर्य ह्यांचा तिला अनुभव असल्यामुळें तिनें तसा कोणताही अविचार मनांत आणिला नाही. परंतु तिच्या दुर्दैवानें, ब्रिटिश अधिकाऱ्यांस संशयपिशाचिकेनें पछाडल्यामुळें, तिला अत्यंत त्रास व विपत्ति हीं सोसावी लागलीं, त्यास उपाय नाहीं !.

 बायजाबाईसाहेबांस ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अवकृपेमुळें जे क्लेश व जे ताप सहन करावे लागले, त्यांचें वर्णन बाईसाहेबांची प्रत्यक्ष भेट घेतलेल्या आंग्ल स्त्रियांनी वेळोवेळीं आपल्या ग्रंथांत दाखल केलें आहे. तें वाचलें ह्मणजे त्यांच्या अनुकंपनीय स्थितीबद्दल मनांत करुणा उत्पन्न झाल्यावांचून राहत नाहीं. मिसेस फेनी पार्क्स ह्या आंग्ल स्त्रीनें ता. ९ जून इ. स. १८३६ रोजीं अलहाबाद येथें बायजाबाईसाहेबांची भेट घेतली होती. त्या भेटीची नोंद आपल्या रोजनिशीमध्यें लिहितांना तिनें पुढील उद्गार काढिले आहेत :– "बायजाबाईसाहेबांस फार क्रूरपणानें व अन्यायानें वागविलें जात आहे. ज्या महाराणीनें ग्वाल्हेर संस्थानचा राज्यकारभार चालविला, तिला राहावयास येथें छप्पर देखील नाहीं. पर्जन्यकालास सुरवात झाली असून, तिला सक्तीनें तंबूमध्यें राहावयास लाविलें आहे; व तिच्या मर्जीविरुद्ध तिला राजकीय कैदी करून येथे ठेविलें आहे."


 1. "Surely she is treated cruelly and unjustly - she who once reigned in Gwalior has now no roof to shelter her: the rains have set in; she is forced to live in tents, and is kept here against her will, — a state prisoner, in fact."- Wanderings of a Pilgrim, Vol. II. page 51.