पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/158

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४सरकारच्या दरबारांत व इंग्रजी दरबारांत त्यांचा लौकिक अद्यापि गाजत होता. खुद्द महाराज जयाजीराव शिंदे हे प्रसंगविशेषीं त्यांची सल्लामसलत घेत असत; व त्यांच्या शहाणपणाची फार तारीफ करीत असत. अशा रीतीने बायजाबाईसाहेबांचा ग्वाल्हेर येथें शांतपणानें व प्रतिष्ठितपणानें कालक्षेप चालला होता. तो मध्यंतरीं, इ. स. १८५७ सालचें बंड उद्भवलें. त्यानें त्यांचा, ग्वाल्हेर संस्थानचा, किंबहुना सर्व हिंदुस्थानाचा शांतपणा भंग केला.

 इ. स.१८५७ सालीं ग्वाल्हेर येथें जें भयंकर बंड झाले, त्याचा वृत्तांत सर्वश्रुतच आहे. ह्या बंडाच्या योगानें ग्वाल्हेर येथें कांहीं वेळ राज्यक्रांति झाली. व खुद्द महाराज जयाजीराव शिंदे ह्यांस आपल्या सर्व कुटुंबीय मंडळीसुद्धा आपली राजधानी सोडावी लागली. त्यांच्या पश्चात् श्रीमंत रावसाहेब पेशवे, झांशीच्या राणी लक्ष्मीबाईसाहेब, व तात्या टोपे ह्यांनीं ग्वाल्हेर सर करून तेथें नवीन राज्याची संस्थापना केली. ह्या बिकट प्रसंगी महाराज जयाजीराव शिंदे, महाराणी बायजाबाईसाहेब, आणि दिवाण दिनकरराव ह्यांनीं जें वर्तन केलें, ते फार शहाणपणाचें व धूर्ततेचें होतें. त्यामुळेंच ब्रिटिश राज्यसत्तेचा विजय होऊन ती पुनः संस्थापित झाली, असें ह्मणण्यास मुळींच हरकत नाही. ह्या अत्युत्कृष्ट वर्तनाबद्दल महाराज जयाजीराव शिंदे व दिवाण दिनकरराव ह्यांची सर्वत्र प्रशंसा झाली आहे; व ती योग्य आहे. तथापि, ह्या प्रसंगीं महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांनी जें वर्तन केले, ते फार उदारपणाचें व थोर मनाचें असून, तें अधिक स्तुतियोग्य होतें, असे ह्मटल्यावांचून आमच्यानें राहवत नाही. महाराज शिंदे सरकार व दिवाण दिनकरराव ह्यांनी सर्व लोकमताचा प्रवाह झुगारून देऊन, केवळ "ब्रिटिश सरकारचा स्नेह व त्यांचा न्यायीपणा" ह्यांकडे दृष्टि दिली, आणि आपल्या कुलास चिरभूषणावह अशीच गोष्ट केली. ह्यांत त्यांचे दूरदर्शित्व, चातुर्य आणि