लष्करी अधिकाऱ्यांनी, इ. स. १८२९ मध्ये, लॉर्ड कोंबरमियर ह्यांच्या भेटीच्या प्रसंगानुरोधानें जे लेख लिहिले आहेत, ते विशेष अनुकूल नाहींत. त्यावरून युरोपियन लोकांस प्रिय होण्यासारखें मार्दव त्या वेळी ह्यांच्या ठिकाणी होते असे दिसत नाही. मराठी तऱ्हेची ऐट, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य हे गुण ह्यांच्या ठिकाणी विशेष होते. 'एशियाटिक जर्नल' मधील एका लेखकानें, इ. स. १८२७ साली दौलतरावांचे मृत्युवृत्त लिहितांना, असे लिहिलें आहे कीं, "बायजाबाईसाहेबांचे बंधु हिंदुराव ह्यांचे दौलतरावांवर अखेर अखेर फार वजन होते. हे बाणेदार मराठ्याची एक हुबेहूब प्रतिमा होते; आणि ह्यांना जर संधि प्राप्त झाली असती, तर हे प्रतिशिवाजीच निघाले असते.१[१]” हिंदुरावांची ऐट व बाणेदारपणा वायजाबाईसाहेबांचे स्वातंत्र्य नष्ट झाल्यावर आपोआप नाहींसा झाला होता. इंग्रज सरकारानें ह्यांस पेनशन करून देऊन दिल्लीस ठेविल्यानंतर हे युरोपियन लोकांचे प्रिय भक्त बनले होते. ह्यांच्याबद्दल बीलसाहेबांनी असें लिहिलें आहे कीं "हे हिंदुस्थानांतील इंग्रज लोकांचे चाहते असून त्यांस ते फार प्रिय झाले होते२[२]."
ह्यावरून हे नेहमी युरोपियन लोकांत मिळून मिसळून वागत असत; व त्यांना प्रिय झाले होते असे दिसून येते. इंग्रजांचे प्राबल्य व त्यांची युद्धसामग्री पाहून त्यांच्यापुढे कोणाचा टिकाव लागणार नाही अशी हिंदुरावांची पुढे पुढे समजूत झाली होती. ह्याबद्दल एक मौजेची आख्यायिका एका युरोपियन गृहस्थाने लिहिली आहे. ती येणेप्रमाणे: इ. स. १८३८ मध्ये फेरोजपूर मुक्कामी इंग्रज व शीख लोक ह्यांचा कांहीं