पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/110

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६च्याविषयीं अतिशय कलुषित झालें. ह्या वेळीं ग्वाल्हेर दरबारचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट हे फार भले व थोर गृहस्थ होते. त्यांनी महाराजांची चांगली कानउघाडणी करून, त्यांस ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फलद्रूप झाला नाहीं. इ. स. १८३० सालीं-ह्मणजे महाराजांच्या १५ व्या वर्षीं-मेजर स्टुअर्ट ह्यांची व महाराजांची जी मुलाखत झाली, तिचें वर्णन त्यांनी आपल्या खलित्यामध्यें येणेंप्रमाणें केलें आहेः- "महाराजांस ज्या वेळी मी विचारिलें कीं, "तुमची कशी काय हालहवाल आहे ?" त्या वेळीं त्यांनी उत्तर दिलें की, "मी सुखी आहे; परंतु सर्व राज्याधिकार बाईसाहेबांच्या हातीं आहे." मी त्यांस उत्तर दिलें की, "बरोबर आहे. तुमचें अद्यापि अल्पवय असल्यामुळें तुह्मीं राज्याधिकार आपल्या हातीं घेण्याची इच्छा करणें प्रशस्त नाहीं. तुह्मीं कोणाच्या तरी तंत्रानें वागलें पाहिजे. ह्या कामीं तुमच्यावर देखरेख करण्यास बाईसाहेब ह्याच फार योग्य आहेत. तुह्मांस बाईसाहेब ज्या रीतीनें वागवितात, त्यांत कांहीं तुह्मांस तक्रार करण्यासारखें असेल, तर मला सांगा. मी त्याचा योग्य बंदोबस्त करीन." परंतु महाराजांनी ह्या प्रश्नाचें उत्तर "माझे बरें आहे, मला कांहीं सांगण्यासारखें नाहीं." अशा प्रकारचें उडवाउडवीचें दिले. मग मी त्यांस विचारिलें कीं, "तुमचे जर सर्व कांहीं ठीक आहे, व तुह्मांस बाईसाहेबांच्या विरुद्ध तक्रार करण्यास जागा नाहीं, तर तुह्मी नौकरचाकरांवर प्रसंगविशेषीं तरवारी उपसता, व लग्नाच्या वेळी तर तुह्मीं त्यांच्यावर बाण सोडले, अशा प्रकारचें चमत्कारिक वर्तन कां केले ? त्यामुळें लग्नप्रसंगी एक मनुष्य ठार मेला, हे तुह्मांस माहीत नाहीं काय ?" (लग्नाच्या वेळीं महाराजांनीं बाण सोडल्यामुळे धारच्या पवारांचा एक नौकर जखमी होऊन मृत्यु पावला.) ह्या प्रश्नास महाराजांनीं अतिशय बेपरवाईनें उत्तर दिलें कीं, "भगवानानें जसें केलें तसें झालें!" त्यावर मीं त्यास असें सांगितलें