पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७

मुत्सद्दी असून, त्यांनीं ग्वाल्हेरच्या राज्यकारभारांत बायजाबाईसाहेबांस उत्कृष्ट मदत केली होती. त्यांचें मृत्युवृत्त विलायतेंतील "एशियाटिक जर्नल" मध्यें छापलें असून, त्यांत रावजी त्रिंबक ह्यांच्या मृत्यूनें ग्वाल्हेर दरबारांतील एका कर्तव्यदक्ष आणि राजकारणपटु प्रधानाची जागा रिकामी झाली, व ती पुनः सहज रीतीनें भरून येणें कठीण आहे असें ह्मटले होतें. ह्यावरून रावजी त्रिंबक ह्यांची योग्यता व्यक्त होते. रावजी त्रिंबक हे मोठे स्वधर्मनिष्ठ व दानशूर गृहस्थ होते. ह्यांनी काशी वगैरे ठिकाणीं घाट व देवालये बांधली आहेत.

 रावजी त्रिंबक मृत्यु पावल्यानंतर कांहीं दिवस, बायजाबाईंनीं कोणासही दिवाण न नेमितां, आपण स्वतः राज्यकारभार चालविला. परंतु पुढें त्यांनीं सखो शामजी व दादा खासगीवाले ह्या उभयतांस राज्यकारभार पाहण्यास सांगितलें. परंतु थोड्याच दिवसांत जनकोजी शिंदे ह्यांचा व त्यांचा उघडपणे बेबनाव होऊन, दरबारी लोकांत दुफळी झाली; व जनकोजीरावांचा पक्ष प्रबल होऊन बायजाबाईसाहेब ह्यांस ग्वाल्हेरचीं राज्यसूत्रें सोडून देणें भाग पडलें. ह्या राज्यक्रांतीची हकीकत पुढील स्वतंत्र भागांत सादर केली आहे.

 बायजाबाईसाहेब ह्यांच्या राज्यकारभाराची विस्तृत माहिती उपलब्ध नसल्यामुळें आह्मांस ती सादर करितां येत नाहीं. तथापि त्यांच्या अंगीं राज्यसूत्रें चालविण्याची चांगली शक्ति होती, हे निर्विवाद सिद्ध आहे. ग्वाल्हेरच्या एका एतद्देशीय इतिहासकारानें, "बायजाबाई राज्यकारभारांत बहुत दक्ष व शहाणी असे, व दरबारी लोकांवर हिचा दरारा


 १ "Raoji Trimbak, the Karbhari of the Gwalior Court, died on 26th January A. D. 1833. His loss as a zealous and able minister will not, it is feared, be easily replaced.”

-Asiatic Journal 1833.