पान:बाणभट्ट.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८७ ) , पूर्वी जसा कशाच्या नादी लागून फार दिवस राहिलास, तसें आतां करूं नकोस. हे मी तुला काकुलतीनें सांगतें !" तो झणाला, " आई ! त्यावेळी दिग्विजय करतां गेलो होतों, ह्मणून फार दिवस लागले. आतां काय तें वैशंपायनाला आणण्याचेच काम. तर तूं कांही चिंता करूं नकोस. " मग विलासवतीने मोठ्या कष्टानें त्यास आज्ञा दिली. नंतर तो पित्याकडे गेला. 'युवराज आले आहेत' असें द्वारपालाने सांगितल्यावर तारापीड आपल्या शयनावर उठून बसला. मग चंद्रापीडानें नमस्कार केल्यावर त्यास जवळ बसवून तारापीड ह्मणाला, बाळा, पित्यानें दोषारोप केला ह्मणून मनांत दुःख बाळगूं नकोस, तूं सद्गुणी आहेस अशी माझी खात्री झाल्यामुळे हे सर्व राज्य तुझ्या स्वाधीन केले आहे. याकरितां सर्व प्रजेचें मनोरंजन कर ण्यास तुला झटले पाहिजे. आह्मी आजपर्यंत कोणाची अवमर्यादा केली नाहीं. इंद्रियांस वश होऊन उपहास करून घेतला नाहीं. अधिकार- मदानें पाहिजे तें करून परलोक बुडविला नाहीं. कीर्तीस जपलों, देवलोकी दुर्लभ अशीं सुर्खे भोगलीं; तूं जन्मास आल्यामुळे कृतार्थहि झालो. आतां इतकेंच मनांत होतें की, तुझा विवाहसमारंभ पहावा आणि सर्व राज्यभार तुजवर सोंपवून वनांत जाऊन राहिलेले आयुष्य ईश्वरभजनांत घालवावें. परंतु हे मध्येच विघ्न आले. वैशंपायनाला कां अशी बुद्धि व्हावी ? तेव्हां इच्छा पूर्ण होते कीं नाहीं कोण जाणे ! तर बालकाला सांगणे इतकेंच कीं, माझा मनोरथ जागचेजागींच नाहीसा होईल असे मात्र करूं नकोस. लौकर परत ये. " असें बोलून त्यान मोठ्या दुःखानें त्यास आज्ञा दिली. मग तो शुकनासप्रधानाकडे गेला. व त्यास विचारून ज्या ठिकाणीं इंद्रायुध उभा होता तिकडे तो गेला. त्या ठिकाणी पाहतो तो इंद्रायुध मार्गे सरत होता, व रडके स्वर काढीत होता. आपले कान खालीं पांडून खिन्न दिसत होता. ते पाहून चंद्रापीडाच्या मनांत आले की, है दुश्चिन्ह समजून कोणी आपले निवारण करील, तर आतां येथें न थांबतां झदिशीं निघून जावें. असा विचार करून वैशंपायन व कादंबरी यांच्या भेटीच्या अत्युत्कंठेनें इंद्रायुधावर बसून तो नगराबाहेर निघून गेला. शिमानदीवर ज्या ठिकाणाहून युवराजाची स्वारी जावयाची होती, त्या ठिकाणी प्रस्थानमंगलाची तयारी केली होती. परंतु युवराजाची स्वारी पर- भारेंच गेली असे कळतांच राजे व सैनिक चंद्रापीडाच्या मार्गे धावत गेले.