पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ह्यातून भारताच्या वनप्रदेशांचा स्वित्झर्लंड बनू शकेल. स्वित्झर्लंडची विपुल वनराजीही केवळ गेल्या दीडशे वर्षात फोफावलेली आहे. त्यापूर्वी स्वित्झर्लंडचे केवळ चार टक्के वनावरण शिल्लक होते. तेव्हा लोकजागृति होऊन त्या देशाने पुन्हा जंगल वाढवले आणि जे वाढवले ते सरकारी खात्याच्या हातात देऊन नाही. स्वित्झर्लंडचे सारे जंगल गावसमाजांच्या मालकीचे आहे. सामूहिकरीत्या चांगली काळजी घेऊन त्यांनी वनराजी पुनरुज्जीवित केली. लोकांच्या सान्निध्यात, लोकांच्या प्रयत्नाने, कळकळीने निसर्ग सुस्थितीत राहतो. आपल्या वनाधिकार कायद्यातून हीच फलप्राप्ति होऊ शकेल. भारताची सारी अरण्यभूमि वैविध्यहीन आणि लोकांना पूर्ण निरुपयोगी बनावी असा जो पद्धतशीर प्रयत्न गेली दीडशे वर्षे चालू आहे, तो पलटवून पुन्हा अरण्यसूक्तात प्रशंसा केल्याप्रमाणे ही भूमी अकृषीवला-नांगरलेली नाही- तरीही बहुअन्ना- भरपूर आहार पुरवणारी, आणि मृगांची माता बनवायची सुवर्णसंधि आज आपल्यापुढे आहे. ऋणनिर्देश मी पुण्याला वेताळच्या डोंगराच्या पायथ्याशी जन्मलो. त्याच्या पूर्व उतारावर लॉ कॉलेजच्या मालकीचे आणि उत्तर उतारावर राखीव जंगल होते. त्यांच्यात भटकत, वडलांबरोबर पक्षिनिरीक्षण करत जीवशास्त्राचा विद्यार्थी बनलो. फग्र्युसन कॉलेजात शिकत असताना डॉ वर्तकांबरोबर सह्याद्रीच्या वनराजीची ओळख करून घेतली. मग १९७१ पासून आजतागायत पूर्ण वेळ वने, वन संसाधनांचे व्यवस्थापन, वन निवासी, वनांचा इतिहास यांच्या अभ्यासात घालवला. ह्या प्रवासात आजतगायत अगणित लोकांच्या सहभागातून जो समज आला, त्यातून ही पुस्तिका निर्माण झाली. या सर्वांचा नामोल्लेख इथे करणे उचित आहे, पण दुर्दैवाने अशक्यप्राय आहे. गेली कित्येक वर्षे वनोपजांवर अवलंबून असणारे आदिवासी, वैदू, शेतात राबणारे शेतकरी, चराई करणारे गुराखी, भटकंती करून उदरनिर्वाह करणारे भटके, गोया व खाच्या पाण्यात मासेमारी करणारे मासेमार, कष्टकरी, विविध विद्यापीठे, शाळा- महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, सेवाभावी संस्था, वन विभागाचे व इतर शासकीय अधिकारी, पंचायतींचे पदाधिकारी, लोकसभा, विधानसभांचे सदस्य, कर्नाटक आणि केंद्र शासनातील मंत्री, अशा सर्वांबरोबर काम केले. त्या सर्वाचा मी मनापासून ऋणी आहे. ह्यातला बराचसा काळ बेंगलूरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील परिसर विज्ञान केंद्रात काढला. ह्या संस्थेचे आणि तिथल्या सहका-यांचे एकूण सगळ्या कामातील योगदान अमूल्य आहे. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत आघारकर संशोधन संस्था, पुणे ह्यांनी सुद्धा हा प्रवास पुढे चालू राहण्यात मोठी मदत केली. भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने व कर्नाटक सरकारच्या वन विभागाने आरंभापासून आर्थिक व इतर अनेक प्रकारचे सहकार्य दिले. ही पुस्तिका लिहीत असताना उत्कृष्ट माहिती व इतर मदत पुरवणारे व सूचना देणारे डॉ. आनंद मसलेकर, मोहन हिराबाई हिरालाल, देवाजी तोफा, चरणदास तोफा, शांताराम पंदेरे, एकनाथ बागुल , विक्रम कान्हेरे, रुपसिंग शेवाळे, करमसिंग पवार, दगडू गंगाराम बनकर, कौस्तुभ पांढरीपांडे, अमिताभ बेहेरा, लता, रिफ़त,