पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोदा फौजेचे पहिले भारतीय जनरल होते. हा हुकूम मिळताच दुसऱ्या दिवशी मकरपुऱ्यात महाराजांना भेटून नानासाहेबांनी त्यांचे आभार मानले. यावेळी बोलताना महाराजांनी त्यांचे कौतुक करतानाच त्याआधी इच्छा असतानाही नानासाहेबांना जनरलपदी कायम न करण्यामागील अडचणी समजावून सांगितल्या. ‘तुम्ही आमच्या देखरेखीखाली तयार झालेली जुनी माणसे असून तुमच्याकडून आम्हास अद्याप मोठमोठी कामे करून घ्यायची असल्याचे' महाराजांनी त्यांना सांगितले. जनरलपदी नियुक्तीच्या बातम्या मराठी, गुजराथी व इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होताच संस्थानाबाहेरील अनेक व्यक्तींनी नानासाहेबांचे पत्राद्वारे अभिनंदन केले. अनेक वर्तमानपत्रांमध्ये नानासाहेबांचा अल्पपरिचय प्रसिद्ध करण्यात आला. बडोद्याचे प्रसिद्ध मराठी शाहीर रा. यादवराव पवार यांनी नानासाहेबांवर कविता करून त्या जनतेत वाटल्या.
पूरस्थितीत मदतकार्य
 २४ जुलै १९२७ रोजी अचानकपणे आलेल्या धुवांधार पावसाने केवळ ८ तासांच्या कालावधीत बडोदा शहरात पूरस्थिती निर्माण झाली. यावेळी नानासाहेबांनी रात्रभर अधिकाऱ्यांना सूचना देऊन पुरात अडकलेल्यांना लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. रात्री २ च्या सुमारास पलटणीच्या वसाहतीत छातीइतके पाणी आल्यामुळे नानासाहेब तेथे जाण्यास निघाले. परंतु

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ४४