पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पदे अस्तित्वात होती. सुरुवातीला सयाजीरावांनी सेनापतीचे काही अधिकार नानासाहेबांकडे व काही अधिकार गणपतराव गायकवाड यांच्याकडे दिले. या अधिकाराच्या विभागणीमुळे जनरलच्या अलाउन्सपैकी अर्धा अलाउन्स आपल्याला मिळावा अशी गणपतरावांनी मागणी केली. यावर नानासाहेबांनीच जनरलचे सर्व अधिकार वापरावेत असा आदेश महाराजांनी दिला. नानासाहेब हे लेफ्टनंटच्या दर्जापासून पायरीपायरीने बढत्या घेत जनरल झालेले पहिले भारतीय होत. त्याचप्रमाणे नानासाहेबांच्या आधी बडोदा फौजेमध्ये १८५० पासून जनरल पदी नेमण्यात आलेले जनरल डिव्हिन, जनरल हार्डी, जनरल निसन, जनरल गॉर्डन, जनरल बर्डवूड इ. सर्व अधिकारी युरोपियन अथवा युरेजियन होते. नानासाहेब बडोदा फौजेचे पहिले भारतीय जनरल होते.
 १९२० मध्ये भारतात देशी संस्थानांच्या फौजेच्या पुनर्रचनेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पुनर्रचनेची योजना सर्व संस्थानिकांस समजावून सांगण्यासाठी ब्रिटिश मेजर जनरल हॅरी वॉटसन यांनी संपूर्ण भारताचा दौरा काढला. १० डिसेंबर १९२१ रोजी वॉटसन यांनी बडोद्याला भेट देऊन नवीन योजना 'समजावून सांगितली. यावेळी नानासाहेब जनरल पदावर नसतानादेखील त्यांना जनरल बडोदा फौजेचे निसन यांच्याबरोबर उपस्थित राहण्याची

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / ४२