पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आल्या. या वखारीला बराच आर्थिक नफा मिळत होता. ही वखार सुमारे दोन वर्षे कार्यरत होती. नानासाहेबांच्या बदलीनंतर नवीन येणारा कमांडिंग ऑफिसर ही वखार चालवू शकणार नसल्यामुळे वखार बंद करून हिशेबाप्रमाणे लोकांना त्यांचे पैसे नफ्यासह परत देण्याचा आदेश वरिष्ठांनी दिला. त्यानुसार या वखारीचा हिशेब पूर्ण करून ती बंद करण्यात आली. प्रत्येक शिपायास गुंतवलेल्या १ रुपयापाठीमागे १ रुपया नफा मिळाला.
परदेशात उच्चशिक्षणाची दवडलेली संधी

 सप्टेंबर १९०५ मध्ये परदेश दौऱ्यावर असताना सयाजीराव महाराजांनी लष्करातील ५ अंमलदारांना परदेशी पाठवण्याचा आदेश दिला. या पाच अधिकाऱ्यांमध्ये नानासाहेबांचा समावेश होता. या आदेशात सयाजीराव लिहितात, "या अंमलदारांनी मुख्यत्वे करून युरोप देशात व काही दिवस इजिप्तमध्ये प्रवास करून तेथील लोकस्थिती, राजकीय स्थिती व निरनिराळ्या प्रकारच्या संस्था यांची चांगली माहिती करून घ्यावी. असे केल्याने आपल्या लोकांत योग्य शिक्षणाचा प्रसार होऊन एकंदर देशा पुष्कळ प्रकारे फायदा होण्याचा संभव आहे. येथे ज्या संस्था पाहावयाच्या त्यात नाटक वगैरे करमणुकीच्या संस्थांचाही समावेश होतो, असे समजावे. कारण त्यापासूनही एकप्रकारचे शिक्षण मिळते. आपल्या देशातील अशा संस्थांतून योग्य सुधारणा इकडील दिशेवर होण्याची जरुरी आहे. मात्र अशा करमणुकीच्या बाबतीत या अंमलदारांनी मर्यादेबाहेर खर्च करू नये.

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / २५