पान:बडोद्याचे जनरल नानासाहेब शिंदे.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाल्यास मिलिटरी सेक्रेटरीचा पगार थांबवण्याचा आदेश दिला. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या पाडगावकरांनी हे नियम तयार करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती नानासाहेब आणि केशवरावांना केली. त्यानुसार जुने हुजूर हुकुम व वटहुकुम क करण्याची आणि किंग्ज रेग्युलेशन, आर्मी रेग्युलेशन इ. इंग्रजी ग्रंथातून घ्यावयाची कलमे पेन्सिलीने एकत्र लिहून देण्याची जबाबदारी सावंतांनी स्वीकारली; परंतु प्रत्यक्ष नियम लिखाणाचे काम नानासाहेबांनीच करावे अशी अट केशवरावांनी घातली. नानासाहेबांना ही अट मान्य करावी लागली.
 नियम लिखाणाचे काम सुरू करताना दोन वर्षांत पाडगावकरांनी केलेले काम पाठवण्याची विनंती नानासाहेबांनी केली असता ' आजवर एक ओळही लिहिली नसल्याचे त्यांनी कळवले. केशवरावांनी कबूल केल्याप्रमाणे आपली जबाबदारी पार पाडली. नानासाहेब आणि केशवराव एकमेकांच्या जवळच राहत असल्यामुळे हे काम करणे सोपे झाले. पलटणीची जबाबदारी सांभाळत नानासाहेबांनी तीन महिन्यांत ड्रेसी फौजेच्या नियमांचा मसुदा तयार केला. या मसुद्याची चिकित्सा करण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली होती. मसुद्याची चिकित्सा करून समितीने या मसुद्याला संमती दिल्यानंतर हे नियम छापण्यात आले. या नियमांचे प्रत्येकी अडीचशे पानांचे दोन खंड तयार झाले. विशेष बाब म्हणजे पाडगावकरांच्या स्नेहाखातर आणि खात्याची सुधारणा व्हावी या प्रेरणेने नानासाहेब आणि केशवरावांनी हे काम विनामोबदला पूर्ण केले.

बडोद्याचे जनरल : नानासाहेब शिंदे / २३