पान:फुलाचा प्रयोग.djvu/1

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या देशात नुकतीच राज्यक्रांती झाली होती. नवीन राजा गादीवर आला होता. तो राजा तरुण होता, उदार होता. आपल्या देशाची भरभराट व्हावी, देश सुखी व्हावा असे त्याला वाटत होते. इतर देशांचे कारभार कसे आहेत, त्या त्या देशांतून काय काय विशेष गोष्टी आहेत, ते सारे पाहावे म्हणून तो तरुण राजा प्रवासासाठी निघून गेला. त्याने राज्याची सर्व जवाबदारी दोन प्रधानांवर सोपवली होती.

राज्यक्रांतीच्या वेळेस ह्या दोन प्रधानांना लोक देवाप्रमाणे मानीत. त्यांच्या नावाचा जयजयकार केला जाई. किती त्यागी, किती त्यांची देशभक्ती, असे सारे म्हणत. परंतु पूर्वीप्रमाणे लोकांची श्रद्धा त्यांच्यावर राहिली नाही. समाजात काही मत्सरी लोक असतातच. अशा मत्सरी लोकांनी त्या दोन प्रधानांच्या विरुद्ध सारखी मोहीम सुरू केली. हे प्रधान स्वार्थी आहेत, मानासाठी हपापलेले आहेत. राजाला ह्यांनीच प्रवासासाठी पाठविले, ह्यांना सर्व सत्ता स्वत:च्या हाती घ्यावयाची आहे, कसली देशभक्ती नि कसले काय, अशा प्रकारचा विषारी प्रचार त्यांनी सुरू केला. सभांतून, वर्तमानपत्रांतून, खाजगी बैठकींतून एकच सूर ऐकू येऊ लागला.

लोक चंचल असतात. ते आज एखाद्याची पूजा करतील, उद्या त्याचीच कुतरओढ करतील. ते आज जयजयकार करतील, उद्या शिव्या-शाप देतील. आज उंचावर चढवतील, उद्या खाली ओढतील, आज फुलांचे हार घालतील, उद्या दगड मारतील.