Jump to content

पान:फुलाचा प्रयोग.djvu/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्या दुसऱ्या प्रधानास तुरुंगात ठेवण्यात आले. स्वदेशातील ही सारी घडामोड राजाला कळविण्यात आली. केव्हा येणार राजा? राजा येण्याच्या आतच पुन्हा जनता खवळणार नाही ना? खवळली तर ह्या प्रधानास कसे वाचविता येणार ?
 तो दुर्दैवी प्रधान तुरुंगाच्या कोठडीत होता. इतक्यात कोणी तरी तेथे आले. कोण होते ते ? समजावयाला मार्ग नव्हता. त्या व्यक्तीच्या तोंडावरून बुरखा होता. त्या अज्ञात व्यक्तीने त्या प्रधानाच्या हातात एक चिठ्ठी दिली. काय होते त्या चिठ्ठीत ?
 “ आज रात्री आठ वाजता तुरुंगाच्या दाराबाहेर घोडयात्री गाडी असेल. पडदे असलेली गाडी आहे. तोत तुम्हो बसा व शहराच्या दक्षिण दरवाजाकडे जा. तुम्ही तेथे पोचताच दरवाजा उघडला जाईल. आपण त्याच गाडीतून देशाबाहेर निघून जाऊ."
 तो प्रधान विचार करू लागला. घोड्याच्या गाडीतून जाणे धोक्याचे होते. कोणी गाडी थांबविली तर ? कोणाला संशय आला तर ? दक्षिणे- कडचा दरवाजा उघडण्यात आला नाही तर? परंतु प्राण वाचविण्याचा हाच एक मार्ग होता. आलेली संघी घ्यावी. पुढचे कोणाला कळणार ?
 तो प्रधान रात्र केव्हा होते व आठ केव्हा वाजतात ह्याची वाट 'पाहात होता. शेवटी एकदाचे आठ वाजले. कोणी तरी कोठडीजवळ आले. प्रधानाला त्या अज्ञात व्यक्तीने तुरुंगाच्या बाहेर नेले. तेथे पडदे सोडलेली गाडी होती. प्रधान तोत बसला. गाडी भरधाव निघाली. रात्रीची आठ-साडेआठची वेळ. रस्ते गजबजलेले होते. परंतु त्या गर्दीतून ही गाडी 'वेगाने जात होती. गाडी दक्षिणेकडच्या दरवाजाकडे वळली. तिकडे गर्दी कमी होती. रहदारी कमी होती. गाडी दरवाजाजवळ येऊन थांबली. परंतु दरवाजा बंद. तेथील पहारेकरी दरवाजा उघडीना.
 "अरे, दरवाजा लवकर उघड." गाडीवान म्हणाला.
 " तसा हुकूम नाही." पहारेकरी म्हणाला.
 " हुकूम नाही?" गाडीतून प्रधानाने विचारले.
 " नाही. कोण आहे गाडीत?" पहारेकऱ्याने प्रश्न केला.

दोघांचा बळी * ९