पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/229

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



कथांवरून स्पष्ट होते. या कथा शैलीच्या अंगाने वैविध्यपूर्ण आहेत. ‘काबुलीवाला' पितृहृदय व अबोध कन्याचा सुंदर संवाद होय. मिनीचे लग्न व काबुलीवाल्याचे तुरुंगातून पुनरागमन प्रसंग म्हणजे मानवी संबंधांची सुंदर गुंफण व गुंता. अन्य कथाही तितक्याच लोभस होत.
 ‘वीरांच्या कथा' हे राजेंद्र अवस्थींचं मूळ हिंदीतील पुस्तक. त्यांच्या हिंदी कथांचे मराठी भाषांतर केले आहे. शोभा व-हाडपांडे यांनी. त्या काही वाचनीय आहेत. ‘विनूची आई' लिहिलंय सुभाष देशपांडे यांनी. 'श्यामची आई' या साने गुरुजींच्या पुस्तकाप्रमाणे असणारे हे पुस्तक. यात आचार्य विनोबांच्या आईचे चित्रण आहे. आई ही संस्कारांची जननी आणि खाणही. हे पुस्तक त्याची प्रचिती आणि प्रत्यय देते. एनिड ब्लायटन लिखित 'सिक्रेट सेव्हन' या मूळ इंग्रजी पुस्तकाचा प्रियांका कुलकर्णी यांनी केलेला अनुवाद चपखल म्हणावा लागेल. रहस्य, जिज्ञासा, कुतूहल याने भरलेलं हे पुस्तक मुलांसाठी खजिनाच. बाबा भांड लिखित 'धर्मा' कादंबरिका मराठी बालसाहित्यातली विक्रमी विक्री करणारी व घराघरात वाचली गेलेली रचना. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त या कादंबरिकेवर आजवर दीड लाख प्रती खपल्या आहेत. मराठी बाल साहित्यातील आजवरची ही कीर्तिमान कृती. बाबा भांड हे मराठीतील आबालवृद्ध, तरुण, महिला सर्व वाचक वर्गात प्रसिद्ध असलेले लेखक. डॉ. विजया वाड यांनी मराठी विश्व आणि संस्कृती मंडळाद्वारे अनेक नव्या-जुन्या कृतींचं पुनर्प्रकाशन केले आहे.

 अशा प्रकारे नोबेल विजेत्या साहित्यकारापासून ते सर्व प्रकारच्या श्रेष्ठ रचनाकारांच्या श्रेष्ठ रचना निवडून त्यांचा बाल वाचकांना करून दिलेला हा परिचय स्तुत्य व अनुकरणीय आहे. त्याबद्दल युवराज कदमांचे अभिनंदन व शुभेच्छा

◼◼

दि. २१ जानेवारी, २०१७

प्रशस्ती/२२८