पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


पणत्यांचा प्रकाश (अनुभव कथन)
संपतराव गायकवाड
हृदय प्रकाशन, पोहाळे, जि. कोल्हापूर
प्रकाशन - नोव्हेंबर, २०१५
पृष्ठे - १00 किंमत - १00/

______________________________________

लहान प्रसंगांतून महान विचारांची पेरणी

 मला मुलखावेगळ्या माणसांचं मुळातच मोठं आकर्षण. मी एकदा मुख्याध्यापक झालेल्या माझ्या विद्यार्थ्यांशी बोलत होतो. विषय होता शालेय तपासणीचा. तो सांगत होता तो अनुभव मला अचंबित करणारा होता. त्याच्या शाळेच्या विभागात आलेले शिक्षणाधिकारी शालेय तपासणीला येताना स्वतःचा जेवणाचा डबा घेऊन येतात. तोच खातात. शाळेचा चहापण पीत नाहीत.
 पुढे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एक गट शिक्षणाधिकारी भेटले. ते सांगत होते, “आमचे भाग शिक्षणाधिकारी आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षकांसाठी '(3T)' उपक्रम राबवला आहे. शिक्षक प्रबोधन शिबिर असते. ते शिबिर सरकारी नसते. परिपत्रक, रजा, भत्ता नसतो. उलटपक्षी शिक्षक या शिबिरासाठी सुट्टीतला आपला वेळ (Time) देतात. शिबिरासाठी स्वतः प्रवास खर्च (Ticket) करतात. शिबिराला येताना जेवणाचा डबा (Tiffine) घेऊन येतात. एकदा माझे अनेक वर्षे सहकारी असलेले मित्र सांगत होते. माझा एक भाऊ आहे. तसा सावत्र. पण आम्ही इतके सख्ख्याने राहतो की कुणाला सांगूनही खरं वाटत नाही.
 या तीनही प्रसंगातला मुलखावेगळा माणूस म्हणजे संपतराव गायकवाड.

प्रशस्ती/१७८