पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्थायीभाव. त्यामुळे मूल्यांपुढे पद, वरिष्ठता शून्य मानणाच्या का. मां. नी नोकरीत परवड झाली तरी तत्त्वांशी प्रतारणा केली नाही. बारामतीत वीज कामगारांचं आंदोलन, संगठन यशस्वी करून त्यांना त्यांच्या न्यायाचा वाटा मिळवून देणारा हा संगटक त्याच्या घरी मात्र वीज नव्हती. कामगारांना हे कळताच का. मां. चं घर विजेनं न्हाऊन निघतं ते वर्गणीतून!

 ही असते सचोटी नि त्याची पोचपावतीही! शरद पवारांशी स्नेह, सलगी म्हणून त्याचा गैरफायदा घ्यायची बुद्धी कधी झाली नाही. मागासवर्गीय जन्म, जात त्यांनी बिरुद म्हणून न मिरवता ती इष्टापत्ती मानून त्याचं उन्नयन घडवून आणलं. हे सारं करताना कोणता आव नाही की भाव. 'मी उरलो नावापुरता' अशी निरिच्छता. ही फार दुर्मीळ देणगी. म्हणून प्रत्येक संधीचं सोनं झालं!

 यशस्वी पुरुषामागे असिद्ध स्त्रीची जशी सावली असते तसेच राजकीय नेत्यांचंही! का. मां. सारखे अहोरात्र झटणारे कार्यकर्ते सतत उपेक्षांचेच धनी असतात. पण यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यासारखे अपवाद संस्कारी अशा कार्यकत्र्यांचा त्याग, समर्पण, निष्ठा लक्षात ठेवून योग्य वेळी त्यांची उतराई करतात. का. मां. चं पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद सतत सात वर्ष उपभोगायला मिळणं हा याच काव्यगत न्यायाचा भाग होय.

 अंधार युग प्रयत्नांपुढे थिटं पडतं नि एक दिवस सूर्याचं युग उगवतं ते चंद्राचं सहस्र दर्शन घडवूनच थांबतं. मग येतं कृतार्थपण! ते या आत्मकथेच्या । शेवटी भरलेलं, भारलेलं आढळतं! अशा कार्यकत्र्यास शतायू जीवन लाभावं हीच सदिच्छा! जीवेत शरदः शतम्!!

▄ ▄


'दि. १४ जानेवारी, २०१३'
मकर संक्रांत

प्रशस्ती/१३५