पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कायमची आली नाही तरच आश्चर्य. बायको हवीय मला, पण ती घरकाम करणारी की नोकरी करणारी ? निर्णय न होण्याचा गुंता. सुप्रिया व रोहन शिकूनसवरून मोठे होतात. लग्न न करता एकत्र राहतात. इकडे आई वडलांचा जीव टांगणीला... तिकडे दोघे स्वर्गसुखात.
 असे एक नाही, दोन नाही, शंभर प्रश्न! समाज यक्षप्रश्नांचं महाजाल झालंय. ‘सॉफ्ट' कुटुंबांचे प्रश्न ‘हार्ड' होताहेत याचं भान हे पुस्तक वाचताना पानागणिक येत राहतं. पुस्तक अंगावर येणारं जगणं समजावत ही पुस्तकाची मिळकतच. डॉ. शुभदा दिवाण स्वतः सोशिक महिला आहे... शोषित नव्हे! ज्यांना सोसणं जमतं अशा बहुसंख्य भारतीय महिलांच्या त्या प्रतिनिधी स्वतःचं दुःख समजायला अक्कल लागत नाही. पण दुस-याचं दुःख समजायचं तर तुमचा संवेदना सूचकांक उच्च हवा. तो शिकण्यापेक्षा शहाणपणातून येतो. अनुभवजन्य समज म्हणजे शहाणपण. ते ज्याच्याजवळ असतं तो स्वतःला आवरत दुस-याला सावरत राहतो. समुपदेशक धीर देणारा, मार्ग दाखविणारा, समजून घेणारा, तुमच्या मन, हृदयाचा ठाव घेणारा, तरी तटस्थ राहून जगण्याची युक्ती देणारा ‘संजय' हवा, हे सदरचे पुस्तक लक्षात आणून देतं.
 यातील अनुभव व्यक्तिगत असले तरी प्रातिनिधिक आहेत. वाचक हे वाचतील तर स्वतः समुपदेशक बनतील, हे या पुस्तकाचं बलस्थान होय. डॉ. दिवाण रुग्णांना रुग्ण न मानता 'माणूस' मानतात. यातच त्यांच्या व्यवसाय यशाचं गमक आहे. रोजचं जगणं कठीण झाल्याच्या आजच्या काळात हे पुस्तक वाचकाला फक्त धीर, दिलासा न देता मार्ग दाखवतं. हे पुस्तक वाचताना दोन पुस्तकं आठवली. एक म्हणजे खलील जिब्रानचं महाकाव्य ‘प्रोफेट' आणि दुसरं ‘द मिनिंग ऑफ नो दायसेल्फ'. दोन्ही पुस्तकं जगणं समजावतात. असंच एक पुस्तक आहे ‘कुरल'.पुस्तकं माणसाची मित्र मार्गदर्शक व आयुष्याचे सख्खे सोबती असतात. ‘गोष्टी : समुपदेशनाच्या' हे अशाच पठडीतील पुस्तक.
 ‘जे आपणासी ठावे, ते दुस-यांशी सांगावे। शहाणे करूनी सोडावे सकल जन।।' उक्तीप्रमाणे हे पुस्तक वाचक समाजास प्रगल्भ करेल. सिग्मंड फ्रॉइडने अबोध मनाचे गुंते सोडवले. 'समाजस्वास्थ्य कार र. धों. कर्वे यांनी समाज गुंते ढिले केले. हे पुस्तक जगण्याचा ताण शिथिल करेलअसा मला विश्वास आहे. रक्ताची नाती जिवावर उठण्याच्या आजच्या काळात हे पुस्तक वाट चुकलेल्या युवकांसाठी सामाजिक होकायंत्र बनेल. आजच्या गुंतागुंतीच्या जगण्यात ‘कळतं पण वळत नाही' अशी स्थिती

प्रशस्ती/११०