Jump to content

पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


प्रस्तावना.


 माझे प्रिय शिष्य रा. साने यांनी थोर पुरुषांची चरित्रें लिहून प्रसिद्ध करण्याचे मोठें स्तुत्य कार्य चालविलें आहे. त्यांच्या गोखले चरित्राचा पुरस्कार करण्याचा मान त्यांनी मला दिला. त्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचें चरित्र त्यांनी प्रसिद्ध केलें; आणि आज राजवाडे यांचें चरित्र ते प्रसिद्ध करीत आहेत. चरित्र लेखनाचें कार्य राष्ट्राशिक्षणास अत्यंत उपयुक्त आहे आणि रा. साने यांनी या शाखेत सालोसाल भर टाकण्याचें ठरविलें आहे. याबद्दल त्यांचं करावें तेवढें कौतुक थोडें होईल!
 रानडे, लोकहितवादी अशांसारख्या थोर महाराष्ट्रीयांची जरा विस्तृत चरित्रें त्यांच्या मृत्यूनंतर कैक वर्षांनीं प्रसिद्ध झाली. गोखले यांचें साने यांनीं लिहिलेलेच चरित्र सर्वांत मोठे आहे. टिळकांचें चरित्र त्यांच्या मृत्यूनंतर काळ न दवडतां ताबडतोब लिहिण्याचें हातीं घेऊन रा. केळकर यांनी उत्तर भाग ओढून काढून कां होईना पुरें करून टाकिलें आहे. याचा अर्थ स्पष्ट असा होतो की राष्ट्र जागे झाले आहे, थोर पुरुषांची योग्यता त्यास समजूं लागली आहे, त्यांची आठवण बुजूं नये आणि पुढील पिढीस त्यांची कामगिरी सविस्तर समजावी म्हणून त्यांची चरित्रे प्रसिद्ध होऊं लागलीं आहेत. खुद्द थोर पुरुषांचे शिष्य वा सांप्रदायिक यांनीं वास्तविक हें चरित्र लेखनाचे कार्य करावयास हवे, परंतु त्यांनी ते वेळेवर केलें नाहीं तरी रा. साने यांचेसारखे उत्साही तरुण