Jump to content

पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१
इतिहास संशोधन व इतिहास मंडळ.

करण्याकरितां त्यांचा जन्म झालेला होता. १८९५ मध्ये शेवटीं त्यांनी भाषांतर हें मासिक सुरू केलें. भाषासंवर्धन करावयाचे हा त्यांचा हेतु ठरलेलच होता. मराठी मायभाषा मी वृद्धिंगत करीन हे त्यांचे ध्येय होतेच. जें कांहीं लिहावयाचें तें मराठीत आणण्यासाठी त्यांनी हें भाषांतर मासिक सुरू केलें. त्यांच्या बरोबर डेक्कन कॉलेजमध्ये शिवरामपंत परांजपे, श्री. कृ. कोल्हटकर वगैरे होते. शिवरामपंत, दिनकर त्रिंबक चांदोरकर वगैरे मंडळीनें त्यांस सहाय्य करण्याचे ठरविलें. प्लेटो याच्या रिपब्लिक या जगन्मान्य ग्रंथाचे त्यांनी कॉलेजमध्ये असतांच भाषांतर करून ठेविलें होतें; तें या भाषांतर मासिकांत राजवाडे प्रसिद्ध करू लागले. दुसऱ्याही कांहीं सुंदर ग्रंथांची भाषांतरें प्रसिद्ध झाली. मॉन्स्क्रू यांचे एस्प्रिट दि लाज या ग्रंथाचा तर्जुमा प्रसिद्ध झाला परंतु या भाषांतरार्थ त्यांची स्वतंत्र प्रतिभा जन्मलेली नव्हती. भाषांतराच्या, एकप्रकारें दुय्यम प्रकारच्या कामांत, त्यांच्या अनंत बुद्धिबलाचा व्यय व्हावयाचा नव्हता. यासाठी परमेश्वर निराळीच योजना घडवून आणीत होता.
 सन १८९५-९६ चे सुमारास रावबहादुर काशिनाथपंत साने यांचें पुणें येथें 'महाराष्ट्र इतिहासाचें महत्त्व' या विषयावर एक सुंदर व्याख्यान झालें व त्याचा सारांश केसरीत प्रसिद्ध झाला. या व्याख्यानाचा त्यावेळच्या पुण्यांतील विद्यार्थ्यांच्या मनावर फार परिणाम झाला. वाई येथील रहिवाशी श्री. काकासाहेब पंडित हे त्या वेळी पुण्यास वकिलीचा अभ्यास करण्यासाठी होते. त्यांच्या मनावर वरील व्याख्यानाचा फार परिणाम झाला व